आपल्या मुलांच्या माध्यमातून जबाबदार पुरुष घरातूनच घडवावेत : लीना लेले

0

लोकशाही जागर संस्कृतीचा

स्त्री ही मातेचे स्वरूप आहे. तिच्यातून शक्तीचे दर्शन होत असते. महिलांनी स्वतःला वेळ देऊन कौशल्य अंगीकारावी. या सोबतच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपत आपल्या घरापासूनच एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या मुलांची जडणघडण करावी. जेणेकरून आपल्याला अपेक्षित असलेले पुरुष आपोआप समाजात घडत जातील, असे प्रतिपादन सॉफ्टवेअर डिझायनर आणि डेव्हलपर लीना लेले यांनी लोकशाहीच्या कार्यालयात केले.

नवरात्रीनिमित्त लोकशाहीच्या कार्यालयात जागर संस्कृतीच्या या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सांस्कृतिकते संदर्भात समाजातील प्रतिष्ठित महिलांकडून विचार जाणून घेतले जात आहेत. काल दि. २९ सप्टेंबर रोजी सॉफ्टवेअर डिझायनर आणि डेव्हलपर लीना लेले, रेल्वे रिझर्वेशन सीआरएस सुनंदा पाटील, आर पी एफच्या हेड कॉन्स्टेबल नागज्योती कदम, आरपीएफ कॉन्स्टेबल शबाना तडवी आणि साईकृपा बेन्टेक्स अँड ज्वेलरीच्या संचालिका हेमलता बामनोदकर उपस्थित होत्या.

यावेळी लीना लेले म्हणाल्या, समाजातील महिलांना स्वयंशिक्षणाची गरज असली तरी समाजाने आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. मुलांच्या माध्यमातून आपण हे बाळकडू आपल्या घरापासून देऊ शकतो. मुलांमध्ये आदराची सुरुवात घरापासूनच करावी, जेणेकरून संस्कारांचे मनोदय होऊन महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण होईल. संस्कृतीमधून नेमके काय अपेक्षित आहे, याचे भान असणेही गरजेचे आहे. खाद्यपदार्थांच्या देवाण-घेवाणीपेक्षा महिलांनी वैचारिक देवाण-घेवाण करावी टीव्ही सिरीयल मधून आपण संस्कृती फॉलो करतो मात्र खऱ्या संस्कृतीचा अर्थ जाणून घेऊन तिला अंगीकरावी.

दरम्यान रेल्वे रिझर्वेशन सीआरएस सुनंदा पाटील यांनी सांगितले की, स्त्रीला स्त्रीची मदत मिळणे गरजेचे आहे. आणि या मिळालेल्या मदतीबद्दल तिने कृतज्ञ असणेही तितकेच गरजेचे आहे. नवरात्री हा शक्तीचा उत्सव असतो. माझ्या वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी माझे पती वारले. मात्र मला माझ्या परिवाराने साथ दिली. त्या दिवसापासून प्रत्येक दिवस हा मला संघर्ष म्हणून जगावा लागतोय. प्रत्येक घटनेच्या दोन बाजू असतात. त्यातील कोणती बाजू घ्यावी, हे निश्चित करणे तुमच्या संस्कारांवर अवलंबून असते. त्यामुळे त्यांची योग्यता आपण समजून घेऊ शकतो.

आरपीएफच्या हेड कॉन्स्टेबल नागज्योती कदम यांनी यावेळी सांगितले की, प्रत्येक वेळी महिलेने झुकून चालणार नाही. तिने सशक्त होणे गरजेचे आहे. आम्ही ज्या क्षेत्रात कार्य करतो त्या क्षेत्रामध्ये सातत्याने नवनवीन घटना निदर्शनास येत असतात. अशावेळी आपण कुणाच्यातरी मदतीला आहोत, याचं एक वेगळाच समाधान असतं. नुकतीच माझ्या हातून एका गरीब कुटुंबातील महिलेची रेल्वे स्टेशनवर प्रसूती झाली. तिची नाळ देखील कापली गेलेली नव्हती. अशावेळी त्या मुलाला मी हातात धरून नाळ जोडलेल्या अवस्थेत रुग्णालयात भरती केले. सध्या ते बाळ आणि आई सुखरूप आहे. मात्र विशेष कौतुक याचे वाटते की, त्या महिलेने फोन करून आम्ही सुखरूप असल्याचे सांगितले, तेव्हा मनाला मिळालेले समाधान शब्दात सांगण्यासारखे नव्हते.

यावेळी बोलताना कॉन्स्टेबल शबाना तडवी यांनी सांगितले की, आमच्या क्षेत्रात कार्य करत असताना संघर्ष हा नेहमीचाच आहे. यामुळे परिवार आणि नोकरी याच्यामध्ये ताळमेळ साधून सण उत्सव साजरे करणे बऱ्याचदा कठीण होऊन जाते. महिलांनी हल्लीच्या काळात मल्टीपर्पज कार्य करणे गरजेचे झाले आहे. यासाठी महिलांना तिच्या पतीचा आधार अधिक गरजेचा असतो. मला माझ्या परिवाराकडून नेहमी साथ मिळते. स्त्री ही अमर्याद कार्य करू शकते, मात्र तिला आधार असला तर ती अधिक आनंदाने ते कार्य करते. बऱ्याचदा परिवाराच्या आनंदातच आपला आनंद असतो. त्यामुळे हा ताळमेळ साधता आला तर अधिक जोमाने काम करता येते.

यावेळी बोलताना साईकृपा बेन्टेक्स अँड ज्वेलरीच्या संचालिका हेमलता बामनोदकर यांनी सांगितले की, देवीची विविध रूप ही एका गृहिणीची देखील रूपे आहेत. देवीला जितके हात असतात तितकीच कामे महिला न थकता करतात. स्त्रीमुळेच समाज घडतो. मात्र एकच खंत असते की, नवरात्रीच्या नऊ दिवसानंतर तिच्याप्रतीचा आदर कमी होत जातो. याला वाचा फोडणे, या अन्यायाच्या विरुद्ध लढणे गरजेचे आहे. महिलांना एकटेपणाची भीती वाटणार नाही असे वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. जी स्त्री जग निर्माण करू शकते ती काहीही करू शकते. यातूनच तिच्या सहनशक्तीची आणि सशक्ततेची जाणीव होते. यासाठी तिला परिवाराची साथ असणे देखील गरजेचे आहे. पोलीस खाते, आरोग्य विभाग, शिक्षण या क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचे मला विशेष कौतुक वाटते. कारण या देखील देवीचेच एक रूप आहे, असे त्या म्हणाल्या.

यावेळी लोकशाही कार्यालयात उपस्थित सर्व यशस्वी महिलांनी लोकशाहीचे विशेष आभार व्यक्त केले. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे देखील महिलांचा सन्मान होत आहे, हे अधिक कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

शब्दांकन – राहुल पवार

 

Leave A Reply

Your email address will not be published.