संस्कृतीचा जागर म्हणजे झोपलेल्या संस्कृतीला जागवणे : डॉ. नेहा भंगाळे

0

लोकशाही जागर संस्कृतीचा

आजची पिढी ही समाज माध्यमांमध्ये गुरफटलेली आहे. त्यांना पोटापेक्षा पोस्ट जास्त महत्त्वाची वाटते. हा एकत्रीत दुष्परिणाम कोविड नंतर अधिक वाढला असून त्यांना आपल्या संस्कृतीची जाणीव करून देणे गरजेचे झाले आहे. मुळात संस्कृतीचा जागर करणे म्हणजेच एक प्रकारे झोपलेल्या संस्कृतीला जागवणे आणि जगवणे, असे प्रतिपादन आनंद डायलिसिसच्या डॉ. नेहा भंगाळे यांनी केले.

नवरात्रीच्या निमित्ताने दैनिक लोकशाहीच्या कार्यालयात जागर संस्कृतीचा या विशेष कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सांस्कृतिक संदर्भात समाजातील प्रतिष्ठित महिलांकडून विचार जाणून घेतले जात आहेत. यासाठी आनंद डायलिसिसच्या डॉ. नेहा भंगाळे, शिवसेना नेत्या सरिता माळी-कोल्हे, गायत्री क्रिएशनच्या संचालिका पूजा बोरसे यांच्यासह रेखा शिंदे, दीपश्री शिंदे, यामिनी चौधरी, राधा जोशी, मेघा वाणी, अनिता चौधरी आदी महिला उपस्थित होत्या.

यावेळी बोलतांना डॉ. नेहा भंगाळे म्हणाल्या, नव्या पिढीलाही समजून घेणे गरजेचे आहे. त्यांना त्यांच्या हिशोबाने एन्जॉय करू द्यावा, मात्र त्याला मर्यादा लावून जुन्या आणि नव्याचा ताळमेळ साधता आला पाहिजे. यातूनच ही विकृती टाळता येईल. साधनेतून चांगुलपणा शोधून त्यांना चांगल्या गुणांमध्ये परावर्तित करून, त्याची वृद्धी करणे गरजेचे आहे. मात्र याचा अतिरेकही करता कामा नये. समजून-उमजून हे सार घडवता आलं पाहिजे. खरंतर अतिरेक हेच मुळात व्यसन असून जर सोशल मीडियाला सकारात्मक घेतलं तर त्याला नक्कीच मर्यादा येतील असेही त्या म्हणाल्या.

यावेळी शिवसेना नेत्या सरिता माळी- कोल्हे यांनी सांगितले की, संस्कृतीचा जागर म्हणजेच नारी शक्तीचा जागर आहे. महिलांना अजूनही अवहेलना, अत्याचार, अन्याय सहन करावा लागत आहे. आपण कित्येक काळापासून नवरात्री सादर करत असलो तरी कुठेतरी कमी पडत असल्याची भावना दुखावणारी आहे. सर्वांचं भवितव्य ठरवणारी ही स्त्री असते. तरी ती आज पीडित म्हणून दिसून येते. खरंतर तिने नाईका म्हणून जगायला हवं. कारण तिच्यामध्ये असलेली लढण्याची शक्ती ही अतिउच्च स्वरूपाची असते. आपण बघतो शेतकरी आत्महत्या करतात. मात्र शेतकऱ्यांच्या पत्नीने कधीही आत्महत्या केलेल्याचे आपण ऐकत नाही.

स्त्री ही परिस्थितीनुसार सरस्वती दुर्गा आणि कालीचे रूप धारण करत असते. हल्ली जागतिकीकरणामुळे संस्कृतीते वर परिणाम होतो. मात्र आपली संस्कृती आपण धरून ठेवावी. यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य मात्र मर्यादित वापर करणे ही फायद्याचे ठरते. याचा अतिरेक मात्र त्रासदायक ठरेल. आज महिलांसाठी मी लढत असून तो प्रत्येक दिवस मला नवरात्र भासतो. जर आपली चूक नसेल तर वैचारिक बाजू मांडायला मुळीच घाबरू नका. मी कोरोना काळात गरीब महिलांना प्रत्यक्ष भेटून मदत केली, मात्र मला त्या कोरोना आजाराची लागण झाली नाही. यामागे आशीर्वाद हीच एक प्रतिकारशक्ती मला वाटते.

सहनशील तेथूनच मी अधिक जोमाने काम करू शकते. महिलांनीही अशा पद्धतीने स्वतःमध्ये प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. असे करत असताना सर्व महिलांनी मैत्रीच्या भावनेने जगायला हवे. कारण यातूनच विश्वास वाढीस लागतो आणि तुमची कामे सोपी होत जातात. सांस्कृतिकतेची बीजं देखील या निमित्ताने रोवली पाहिजे. महिलांनी सक्षम होऊन स्वतःसाठी संघर्ष करायला शिकले पाहिजे, तरच ती सशक्त आणि स्वावलंबी होईल. महिलांनी अबला नाही तर सबला म्हणून जगणे गरजेचे आहे. ही मानसिकता आता वाढीस लागली पाहिजे, असे सरिता माळी यांनी सांगितले.

गायत्री क्रिएशनच्या संचालिका पूजा बोरसे यांनी सांगितले की, जनरेशन ही सोशल मीडियामध्ये गुंतलेली आहे. ती सोशल मीडियाशी जरी कनेक्ट असली तरी समाजाशी डिस्कनेक्ट झालेली आहे. घरातील आदरातिथ्य यामुळे नाहीसं होत असून याचा तरुणांवर फार वाईट आणि गंभीर परिणाम दिसून येत आहे. घरातले संवाद देखील हरवले आहेत. हल्ली फक्त शो ऑफ दिसून येत आहे. यासाठी योग्य शिकवणीची गरज आहे. त्यांना सांस्कृतिक तिची जाण करून देणे हा यावरचा योग्य पर्याय आहे असे त्या म्हणाल्या.

त्यांच्या मातोश्रींनी यावेळी सांगितले की, मुलांजवळ बसून त्यांच्याशी बोलणं संवाद साधणं, ही आता महत्त्वाची गरज झाली आहे. मुलांना वेळेचं बंधन देखील शिकवता आलं पाहिजे. मुलांकडे वेगवेगळ्या माध्यमातून लक्ष देता आलं पाहिजे. त्यांचे मित्र कसे आहेत, त्यांचा सहवास कसा आहे, हे जर योग्य ताळमेळ साधून करता आलं, तर नक्कीच परिणाम होतो.

शब्दांकन : राहुल पवार

Leave A Reply

Your email address will not be published.