भाड्याच्या घरात IPL वर सट्टा; तिघे पोलिसांच्या ताब्यात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या IPL चे सीजन सुरु आहे. या आयपीएलवर बऱ्याच ठिकाणी सट्टा लावला जातो. दरम्यान जळगाव शहरातील फातेमानगरात सहाय्यक अधिक्षकांच्या पथकाने एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने रविवारी सायंकाळी छापा टाकून आयपीएलवर सट्टा करणाऱ्यांना गजाआड केले.

सदर पथकाने केलेल्या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून तब्बल ९५ हजार ६०० रुपये रोख आणि ५ मोबाईल व टीव्ही असा ९५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील फातेमा नगर येथे भाड्याच्या घरात आयपीएल मॅचेसवर सट्टा घेतला जात असल्याची गुप्त माहिती सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे रविवारी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, मीनल साकळीकर, महेश महाले , रवींद्र मोतीराया यांच्या पथकासह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील अतुल वंजारी, इम्रान सैय्यद, सचिन पाटील, योगेश बारी यांनी फातेमा नगरात आयेशा किराणाजवळ छापा टाकला.

सदर कारवाईत इम्रान अमीन खान (वय ४०, रा.चिखली ह.मु.फातेमा नगर), वसीम सैय्यद कामरोद्दीन (वय ३८), जावेद नबी शेख (वय ३०, रा. फातेमा नगर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ४० हजार ६०० रुपये रोख आणि ५ मोबाईल हस्तगत व टिव्ही असा एकूण ९५ हजार ६०० रुपयांचा मु्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक इम्रान सैय्यद करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.