रशिया-युक्रेन युद्धाचा भारतावर होणारा परिणाम; जाणून घ्या सविस्तर..

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine War) यांच्यातील तणाव कायम असून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Russia president Vladimir Putin) यांनी युक्रेनवर हल्ला करण्याची घोषणा केल्यानंतर संपूर्ण जग धास्तावले आहे. यामुळे जगभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. इतर देशांप्रमाणेच भारतावर देखील मोठा परिणाम दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय देशवासीयांना महागाईची मोठी झळ बसणार आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेवूया ..

 भारतीय शेअर बाजारावर परिणाम 

रशिया आणि युक्रेन यांच्यात जेव्हापासून हा तणाव सुरू झालाय तेव्हापासून त्याचा मोठा परिणाम जगातील शेअर बाजारांवर झालाय. आजही शेअर बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मोठ्या गुंतवणूकदारांनी शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री सुरु केली आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजार सुरु झाल्यावर पहिल्याच मिनिटांत मुबंईचा शेअर बाजार २००० अंकानी पडला आणि ५५,६८३ अंशांवर पोहचला. या युद्धाचा सर्वाधिक फटका बँकिंग शेअर्सना बसला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे ७ लाख कोटींचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

कच्चे तेल महागण्याची शक्यता 

कच्च्या तेलाच्या किमतींवर लक्ष ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, कच्च्या तेलाच्या किंमती आणखी वाढू शकतात. 2022 मध्ये कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 100 डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज खरा ठरला आहे, असे गोल्डमन सॅक्सने म्हटले होते. त्याच वेळी, जेपी मॉर्गनने 2022 मध्ये प्रति बॅरल $ 125 आणि 2023 मध्ये प्रति बॅरल $ 150 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कच्च्या तेलाच्या किमती पेटल्या आहेत. 2022 मध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत 25 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, गेल्या दोन महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. 1 डिसेंबर 2021 रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 68.87 होती. जे आता प्रति बॅरल $100 च्या पातळीवर व्यापार करत आहे. म्हणजेच दीड महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती खालच्या पातळीपासून 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. सप्टेंबर 2014 नंतर कच्च्या तेलाने प्रति बॅरल $100 वर पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये आता युद्ध पूर्णपणे सुरू झाले आहे. यामुळे कच्चे तेल आणखी महाग होणार हे अटळ आहे

 पेट्रोल- डिझेलवर परिणाम 

कच्च्या तेलाच्या किमती मध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून गॅस ते पेट्रोल व डिझेल यांच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसत आहे.  वर्ष 2019 मध्ये कच्चे तेल व इंधन यांच्या किमती प्रचंड वाढल्या होत्या. रशिया युक्रेन या दोन्ही राष्ट्रांमध्ये हा वाद असाच चालू राहिला तर भविष्यात इंधन दरांमध्ये देखील आपल्याला वाढ झाल्याची पाहायला मिळेल. भारताच्या एकूण आयाती पैकी 25 टक्के आयात कच्च्या तेलाची केली जाते. भारत आपल्या गरजेच्या 80 टक्के पेक्षा जास्त तेल आयात करत असतो. जर ही वाढ अशीच राहिली तर सध्याच्या परिस्थिती चा सगळ्या व्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळू शकतो. यामुळे आगामी काळात मोठा बोजा सर्वसामान्यांवर पडणार आहे.

एलपीजी, केरोसीनचे दर 

कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे एलपीजी, केरोसीन यांच्या सबसिडी मध्ये देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गव्हाचे भाव वाढण्याची शक्यता

काळा समुद्र असणाऱ्या भागाच्या प्रदेशात जर गव्हाची आयात निर्यात करताना काही व्यत्यय आल्यास गव्हाची किंमत आणि इंधनाचा दर वाढू शकतो,अशी भीती तज्ञ मंडळांनी व्यक्त केली आहे. रशिया हा देश जगातील सर्वात मोठा गहू निर्यात करणारा देश आहे व त्यानंतर युक्रेन हा देश जगातील चौथ्या क्रमांकाचा देश म्हणून ओळखला जातो. गव्हाच्या एकूण जागतिक निर्याती पैकी एकंदरीत एक चतुर्थाश वाटा या दोन्ही देशांचा आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रांचा एक अहवाल समोर आलेला होता आणि त्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते की, कोरोना महामारीमुळे आधीच अन्नधान्याच्या किमती मध्ये प्रचंड वाढ झालेली आहे.जर या वस्तू मध्ये वाढ पुन्हा झाल्यास सर्वसामान्यांना जगणे मुश्कील होऊन जाईल.

सोने-चांदी तेजीत 

रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या भावात मोठी तेजी आल्याचे दिसून येत आहे. सोन्याचा भाव पुन्हा एकदा प्रति दहा ग्रॅम ५१ हजार रुपयांनजीक आणि चांदी प्रति किलो ६५ हजार रुपयांजवळ पोहोचली आहे.

रुपयात घसरण 

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध छेडले गेल्याने रुपयातही मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. रुपया ५५ पैशांनी कोसळून ७५.१६ रुपये प्रति डॉलरवर जाऊन पोहचला आहे.

भारताच्या संरक्षण सज्जतेवर परिणाम

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम भारताच्या संरक्षण सज्जतेवरही होऊ शकतो. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची आयात करतो. भारताच्या संरक्षण दलांकडील जवळपास 60 टक्के शस्त्रे ही रशियन बनावटीची आहेत. याशिवाय रशियाकडून एस-400 एअर डिफेन्स सिस्टीम भारताला मिळणार आहे. हे युद्ध झालं तर रशियावर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत रशियाकडून भारताला होणारा शस्त्र पुरवठा खंडित होऊ शकतो.

रशिया आणि युक्रेन यांच्यात तणाव वाढत असल्याने युद्धाला सुरुवात झालीय. अशी तणावाची स्थिती कायम राहिली तर भारतावर मोठ्या प्रमाणावर परिणाम पाहायला मिळेल.

 

– शब्दांकन : शालिनी कोळी

Leave A Reply

Your email address will not be published.