कावीळ समज गैरसमज

0

लोकशाही विशेष लेख 

 

मानवी शरीरातील विविध अवयवयांची विशिष्ट रचना निसर्गाने केलेली आहे. अर्थात या अवयवांची कार्यप्रणाली देखील वेगवेगळी असते. परंतु या सर्व अवयवांच्या सुरळीत कार्यप्रणालीमुळेच मानवी शरीररूपी हि गाडी सुव्यवस्थित सुरु असते. या अवयवांमध्ये अतिशय महत्वाचा अवयव म्हणजे यकृत. काही कारणामुळे या यकृताची कार्यप्रणाली बिघडली कि शरीरांर्तगत पित्ताची कार्यप्रणाली बिघडते आणि मनुष्याचे शरीर पिवळे दिसू लागते. डोळे पिवळे दिसतात आणि लघवी देखील पिवळसर होते. अर्थात हि लक्षण दिसताच आपण कावीळ झाल्याचे निदान करतो. परंतु मानवी शरीराची कार्यप्रणाली बिघडविणारी हि कावीळ (icterhepatitis) म्हणजे नक्की कोणता आजार आहे? या आजाराचे निदान कसे करतात? मुळात कावीळ का होतो? आणि काविळवर वैद्यकीय उपचार नेमके काय आहेत? हेच जाणून घेण्यासाठी मुंबईतील सायन रुग्णालयातील अधिष्ठांता डॉ.मोहन जोशी यांच्याशी साधलेला संवाद

१) कावीळ म्हणजे नक्की काय ?
कावीळ म्हणजे शरीरातील बिलिरुबिन या द्रव्याच्या वाढीमुळे शरीरभर जो पिवळसर पणा पसरतो त्यामुळे डोळे पिवळे दिसतात, लघवीचा रंग देखील गडद पिवळा होतो आणि संडास अर्थात विष्ठेचा रंग हा पांढरा दिसतो म्हणजे कावीळ झाली असं आपण म्हणतो. शरीरात बिलिरुबिन द्रव्याच्या वृद्धीमुळे कावीळ होते. परंतु हे बिलिरुबिन का वाढते तर आपल्या शरीरात ज्या लाल पेशी असतात त्यांचं आयुष्य हे साधारण १२० दिवसांचं असत त्यानंतर त्या नष्ट होतात आणि बिलिरुबिन द्रव्य तयार होत. या लाल पेशीच प्रमाण हे वाढलं आणि त्यामुळे बिलिरुबिन वाढलं कि संपूर्ण शरीर पिवळसर दिसत यालाच कावीळ म्हणतात.

२]कावीळ आणि यकृत याचा संबंध नेमका कसा आहे ?आणि यकृताच कार्य नेमकं काय असत ?
होय काविळीचा आणि यकृताचा संबंध हा आहे. अगोदर आपण यकृताचे कार्य नेमके काय ?हे जाणून घेऊया. यकृत हा शरीरातील सर्वात मोठा अवयव् आहे ज्याचं वजन दीड किलो इतकं असत. हे यकृत (Liver) शरीराच्या उजव्या बाजूला असत. यकृताची अनेक कार्य आहेत. बाईल अर्थात पित्त हे शरीरातच तयार होत . आणि यकृता मार्फत ते खाली पित्ताशयात म्हणजे गॉलब्लॅडर मध्ये येत नंतर यकृतातून हे पित्त लहान आतड्यात ढकललं जात. रक्तातील लाल पेशींचं प्रमाण वाढून बिलिरुबिन मोठ्या प्रमाणात वाढलं कि कावीळ होते. आवश्यक प्रथिन हि यकृतात बनतात. रक्तासाठी आवश्यक अनेक घटक हे यकृतात बनतात म्हणूनच यकृतात बिघाड झाला कि शरीरांतर्गत रक्तस्त्राव होतो. यकृत हे धान्याच्या कोठाराप्रमाणे शरीराची साठवण्याची खोलीचं आहे. प्रथिन, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ याची साठवणूक यकृतात होते. शरीराला आवश्यक तेवढ्या घटकांचा यकृत पुरवठा करत आणि नंतर जेंव्हा या घटकांची कमतरता भासते तेंव्हा त्याचा पुरवठा यकृताद्वारे होतो. शरीरातील हानिकारक टॉक्सिन चा निचरा देखील यकृताद्वारेच केला जातो. एकूणच यकृताचा काविळीशी असा थेट संबंध असतो.

३]काविळीची लक्षण काय असतात ?
काविळीची अनेक लक्षण सांगता येतील. यकृताचा कार्य हे सुरळीत नसेल त्यामध्ये बिघाड झालेला असेल कि काविळीची लक्षण दिसतात. कावीळ झालेल्या रुग्णाला भूक लागत नाही. त्याचे डोळे पिवळे होतात. लघवीचा रंग हा दाट पिवळा होतो. ऑब्स्ट्रॅक्टिव्ह प्रकारच्या काविळीत पित्त आतड्यात पोहचत नाही आणि त्यामुळे विष्ठेचा रंग हा पांढरा होतो. व्हायरल हिपॅटायसिस (Hepatitis) होतो तेंव्हा ऍनिमिया (Anemia) होतो. मॅसिव्ह मलेरिया मध्ये लाल पेशी या मोठ्या प्रमाणात मृत पावल्याने बिलिरुबिन चे प्रमाण वाढते अंडी कावीळ होते.

४]काविळीचे प्रकार नेमके किती आहेत ?आणि कारण काय ?
कावीळ हा आजार नसून आजाराचा एक प्रकार आहे. काविळीचे प्री हिपॅटायसिस, हिपतयासीस आणि पोस्ट हिपॅटायसिस असे मुख्यतः ३ प्रकार असतात. आपल्या रक्तामध्ये तांबड्या पेशी या १२० दिवस असतात त्यानंतर तांबड्या पेशींचा क्षय होतो त्याच बिलिरुबिन बनत. हे बिलिरुबिन वाढलं कि कावीळ होते. मलेरिया, सिकलसेल, ऍनिमिया थॅलेसेमिया या आजारात तांबड्या पेशीचा क्षय मोठ्या प्रमाणात होऊन बिलिरुबिन वाढते आणि यकृतामध्ये बिघड होतो.
यकृतावर ताण पडून कावीळ होते. यकृतामध्ये ट्युमर किंवा सूज असू शकते आणि यकृताचा कर्करोग देखील असू शकतो. विषाणूच्या संसर्गामुळे देखील यकृताचा कार्य बिघडत. आणि पोस्ट हिपॅटायसिस मध्ये यकृतामध्ये बिलिरुबिन तयार करून पाण्यात ते विरघळत आणि हे बिलिरुबिन आतड्यापर्यंत पोहचत. कधी कधी पित्ताशयातील खडे, स्वादुपिंडाचा कर्करोग, पित्त नलिकेत ट्युमर असेल तर कावीळ होते.

५]हिपॅटायसिस आणि कावीळ एकच असते का ?आणि दारूचा आणि काविळीचा संबंध असतो का ?
हिपॅटायसिस आणि काविळीचा समंध आहे. मात्र प्रत्येक हिपॅटायसिस मध्ये काविळीची लक्षण दिसून येतातच असं नाही. आणि बिलिरुबिन देखील वाढतच असं नाही. हिपॅटायसिस मुले यकृताला सूज येते आणि यकृताचे कार्य बिघडते. हिपॅटायसिस चा प्रत्येक वेळी काविळीशी समबंध नसून यकृताला सूज येणे, काही प्रकारच्या औषधांमुळे आणि दारूमुळे, विषाणूच्या संसर्गामुळे देखील यकृताचे कार्य बिघडते. दारूचा आणि काविळीचा थेट संबंध आहे. अल्कोहोल आतड्यामधून शोषून यकृताकडे ढकलले जाते त्यामुळे यकृताला दुखापत होते. सिगारेट ओढल्याने जसा फुफुसाला त्रास होतो तस दारूमुळे यकृताला खूपच त्रास होऊन यकृत निकामी होऊ शकते.

६]कावीळ झालेल्या रुग्णाचा आहार नेमका कसा असावा ?
कावीळ झालॆल्या रुग्णाने आहाराच्या बाबतीत पथ्य नेमकी कोणती पाळावीत ?तर त्यासाठी यकृताचा घेणं महत्वाचं आहे. तांबड्या रक्त पेशी पासून बिलिरुबिन तयार होते शरीरासाठी आवश्यक असणारे पाचक रस यकृतामध्येच निर्माण होतात आणि टॉक्सिन शरीराबाहेर फेकण्याचे कार्य देखील यकृत करते. कावीळ झाली झाली कि यकृताचे कार्य बिघडते त्यामुळेच आहार हा लाईट घ्यावा. आहारात स्निग्ध पदार्थाचा समावेश नसावा. साय काढलेले दूध आणि लोणी काढलेली लस्सी घ्यावी. पेढे अजिबात खाऊ नयेत. यकृतावर ताण पडू नये यासाठीच ताजे, सकस, स्वच्छ आणि मुख्य म्हणजे घरी शिजवलेले अन्नच खावे. हि महत्वाची पथ्य आहेत.

७]कावीळ झालेली आहे किंवा नाही यासाठी कोणत्या तपासण्या आवश्यक आहेत ?
काविळीची कारण अनेक आहेत. म्हणूनच योग्य ती तपासणी केल्यानंतरच काविळीचा प्रकार समजून घेऊन मग त्यावर उपचार केले जातात. रक्तातील लाल पेशींचे प्रमाण तपासण्यासाठी सीबीसी टेस्ट आवश्यक असते. शिवाय लिव्हर फंक्शन टेस्ट देखील असते. यकृतातील संप्रेरकांचं प्रमाण तपासण्यासाठी अल्कलाईन टेस्ट असते. बिलिरुबीनचे प्रमाण देखील तपासले जाते. यकृतातील क्लॉटिंग घटकांचं प्रमाण तपासलं जात. अल्ट्रासोनोग्राफी करून यकृतात पित्ताशयाचे खडे झाले आहेत का ? यकृताला सूज आहे का ? किंवा यकृताचा ट्युमर किंवा कर्करोग आहे का हे देखील तपासात. आणि तसेच गंभीर कारण दिसले कि नंतर एमआरआय, सिटी स्कॅन केले जाते. त्यानंतरच योग्य ते उपचार केले जातात.

८]कावीळ झालेल्या एखाद्या व्यक्ती उच्चमधुमेहाचा त्रास असेल तर अशा व्यक्तीने गोड विशेषतः उसाचा रस वैगेरे प्यायल्याने काही दुष्परिणाम संभवतात का ?
कावीळ झालेल्या रुग्णाला शुगर असेल तीही हाय शुगर असेल तर अशा व्यक्तीला उसाचा रस देणं चुकीचं आहे. परंतु नॉर्मल व्यक्तीने उसाचा रस घेतला तरी चालू शकतो. तसेच ताजा फळांचा रस देखील चालतो. कारण काविळीमुळे स्निग्ध पदार्थांचे प्रमाण कमी केलेलं असते. अशा रुग्णाला उपाशी ठेवणं चुकीचं आहे तर त्याची प्रतिकार शक्ती कमी झालेली असल्याने त्याला हलका आहार द्यावा. आणि शुगर वाढलेली असेल तर इन्सुलिन ची मात्रा द्यावी किंवा मधुमेहाची उच्च दर्जाची औषध द्यावीत
.
९] काविळीवर रामबाण स्वरूपाचा उपचार आहे काय ?
काविळीचे कारण शोधून नंतरच त्यावर सुयोग्य उपचार करण रास्त ठरत. तांबड्या पेशी वाढवल्याने बिलिरुबिन वाढून कावीळ होते. सिकलसेल, थॅलेसेमिया, मलेरिया मध्ये देखील कावीळ होते. विषाणूचा संसर्ग झाल्याने देखील यकृताला सूज येते आणि कावीळ होते मात्र योग्य उपचारानंतर हि कावीळ आटोक्यात येते. पित्ताशयातील खडे, ट्युमर, किंवा कर्करोग असेल तर योग्य त्या औषधोपचार करून किंवा आवश्यक असेल तर शस्त्रक्रिया करून उपचार करता येतात.

१०] काविळीवर शस्त्रक्रियेचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत ?
ऑब्स्ट्रॅक्टिव्ह प्रकारच्या काविळीमध्ये पित्ताशयाच्या नालंकेत जर खडे किंवा स्टोन असेल तर पित्ताशयाची नलिका मोठी करून दुर्बिणीद्वारे हा स्टोन काढता येतो. पितातशयची नलिका लहान आतड्यात जिथे उघडते तिथे लहान वायर घालून प्यपिलोटोन या शस्त्राद्वारे हा स्टोन काढत येतो. हा स्टोन मोठा असेल तर लिथोस्प्रेसि शस्त्रक्रियेद्वारे हा स्टोन काढला जातो. पित्ताशयाच्या नलिकेत, स्वादुपिंडात ट्युमर असेल तर सर्व टेस्ट करून नंतरच हा ट्युमर काढण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. कधी कधी ट्युमर किंवा कँसर असेल तर ३ ते ६ तासांची शस्त्रक्रिया करून किमान या ट्युमरचा आकार लहान करण्याचा प्रयत्न केला जातो. यकृतामध्ये कर्करोग असेल तर तो रक्तवाहिन्यांमध्ये पोहचण्याचा धोका असतो मग अशा रुग्णांमध्ये औषधोपचार करून त्याला बरे करणायचा प्रयत्न होतो. हिपॅटायसिस ए आणि इ हे दूषित पाणी आणि अन्नामुळे होणारे आजार आहेत स्वछता राखून त्यावर मात करता येते. हिपॅटायसिस बी आणि सी हे व्हायरल आजार आहेत. हिपॅटायसिस बी वर लस उपलब्ध आहे आणि बूस्टर डॉस देखील आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.