शेतकऱ्याची आत्महत्या जिल्ह्यासाठी लांच्छनास्पद

0

 

लोकशाही संपादकीय विशेष

 

जिल्ह्यात सत्तेवर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात येतो. निवडून येणारे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतो, असे स्वतःला म्हणवून घेतात. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतात. परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मात्र जैसे थे अशीच आहे. काही बोटावर मोजणारे शेतकरी सोडले तर बाकी सर्व शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देत आपल्या कुटुंबाचे गुजारण करतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे जळगाव तालुक्यातील वडली या गावात ६६ वर्षीय नारायण पाटील यांची आत्महत्या हे होय. एकीकडे हनुमान जयंती हर्षोल्हासात साजरी होत असताना नारायण पाटील यांची पत्नी भारती आणि ३५ वर्षीय मुलगा गणेश हे तिघे कर्जबाजारीपणाला कंटाळून सामूहिक विष प्रशन करून मृत्यूशी झुंज देत होते. अत्यंत गंभीर अवस्थेत या तिघांना वडलीहून जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यात शेतकरी नारायण पाटील यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी भारती आणि मुलगा गणेश हे अत्यावस्थेत असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

 

नारायण पाटील यांची आत्महत्या वडली गावासाठी तर हळहळ व्यक्त करणारी आहेच परंतु संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मन हेलावून सोडणारी आहे. एकेकाळी आत्महत्याग्रस्त शेतकरी नारायण पाटील यांच्याकडे भरपूर शेती होती. घरी सालदार होते. शेतीचे उत्पन्न ही चांगले होत असे. वडली गावात त्यांना मानसन्मान मिळत होता. दोन मुलं गणेश आणि मयूर आणि दोन मुली असे चार अपत्य नारायण पाटलांना होते. पैकी मुलीचे लग्न होऊन ती सासरला गेली. मुलींच्या लग्नकार्यासाठी त्यांना मोठा खर्च करावा लागला. ३५ वर्षाचा मुलगा गणेश बेरोजगार होता. मयूर जेमतेम नाशिक येथे कमाई करतो. गेल्या दहा वर्षात निसर्गाच्या अवकृपेमुळे नारायण पाटलांची शेतीची नापिकी झाली. हळूहळू शेती विकून कुटुंबाचा चरिततार्थ चालवला जात होता. सर्व शेती विकली गेली. घरी फक्त दोन एकर राहिली. बैल जोडी गेली. सालदार गेले. खाजगी पतपेढीतून चार लाखांचे कर्ज घेतले. ते कर्ज फेडता आले नाही. या सर्व बाबींचा नारायण पाटलांच्या मनावर परिणाम होऊन ते नैराश्यात वावरत होते. शेवटी राहते घर विकून भाड्याच्या घरात राहायला गेले आणि त्यांचे मन अधिकच उद्विग्न झाले. नैराश्याने त्यांना घेरले. मुलगा गणेश ३५ वर्षाचा झाला तरी घरची गरिबी आणि बेरोजगारीमुळे त्याचे लग्न होत नव्हते. अशा परिस्थितीत नारायण पाटलांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आणि रात्री पत्नी भारती, मुलगा गणेश याच्यासह सामूहिक विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. त्यात नारायण पाटलांचा मृत्यू झाला, तर पत्नी आणि मुलगा मात्र मृत्यू झुंज देत आहेत. शेतकरी नारायण यांच्या आत्महत्येच्या या घटनेने कोणाच्याही अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

शेतकरी नारायण पाटलांच्या आत्महत्येने जिल्हाभरात हळहळ व शोक व्यक्त होत असला तरी या आत्महत्येने अनेक प्रश्न निर्माण होऊन ते सर्व प्रश्न अनुत्तरीत राहणार आहेत. नारायण पाटलांच्या आत्महत्येचे वृत्त कळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील आदींनी वडली गावी कै. नारायण पाटलांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन केले. तथापि नारायण पाटलांची पत्नी आणि मुलगा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. नारायण पाटलांची आत्महत्या आमच्या लोकप्रतिनिधींसाठी शेतकऱ्याच्या सद्यस्थितीची जाणीव देणारी आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळत नाही. सोयाबीनला भाव कमी आहे. कांद्याच्या भावाने तर वांधाच केला आहे. ज्वारी, बाजरी, हरभरा, तूर खरेदीचे केंद्र शासनातर्फे सुरू होत नाही. शेतकऱ्यांची ही ओरड असताना आमचे लोकप्रतिनिधी मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका लढण्यात मश्गुल आहेत. शेतकरी सर्व बाजूने दाबला जातोय. शेतकऱ्यांच्या नावाने जयघोष करणारे लोकप्रतिनिधींनी मात्र कर्जबाजारी होणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कधी नियोजनबद्ध प्रयत्न केल्याचे दिसत नाही. शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, तरच खऱ्या अर्थाने कै. नारायण पाटील यांना श्रद्धांजली ठरेल. अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशाच वाढत राहतील एवढे मात्र निश्चित…!

Leave A Reply

Your email address will not be published.