हिंगणघाट जळीतकांड प्रकरण.. नराधमाला मरेपर्यंत जन्मठेपाची शिक्षा

0

वर्धा, लोकशाही न्यूज नेटवर्क

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील दोषी विकेश नगराळेला आज मरेपर्यंत जन्मठेपाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी या जळीतकांडात होरपळून पीडितेने अखेरचा श्वास घेतला होता. दोन वर्षांनी नराधम विकेश नगराळेला शिक्षा झाली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाच्या या निकालाची माहिती दिली आहे.

3 फेब्रुवारी 2020 रोजी आरोपी विकेश नगराळेने एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवले होते. 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या विकेशला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत होती. या प्रकरणी 426 पानांचे दोषारोपपत्र, 64 सुनावणी, 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे, पीडित तरुणीच्या मृत्यूला 2 वर्ष पूर्ण होताना काल हा निकाल दिला जाणार होता. परंतु, आता दोषी विकेशच्या शिक्षेवर आज सुनावणी पार पडली. दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सरकारनं विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकमांची नियुक्ती केली होती. या प्रकरणी दोषी विकेश नगराळेच्या शिक्षेवर आज सुनावणी पार पडली. कालच्या सुनावणीत आरोपीवरील गुन्हे सिद्ध झाल्यानंतर त्याला न्यायालयाच्या वतीने दोषी ठरवण्यात आले होते. आज त्याला मरेपर्यंत जन्मठेपाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

न्यायालयाने जरी आपला निकाल दिला असला तरी आम्ही यावर समाधानी नसल्याचे पीडितेच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया आहे. आरोपीला या प्रकरणात फाशीची शिक्षा व्हायला हवी होती असे पीडितेच्या आईने म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.