धक्कादायक.. उष्माघातामुळे राज्यात 25 जणांचा बळी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात सध्या विचित्र तापमान पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊसाचा इशारा तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. या उष्माघातामुळे अनेक लोक दगावले आहेत. तसेच उष्माघातापासून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. तसेच केंद्र सरकारकडून देखील सर्व राज्यांना उष्माघातापासून सावध राहा असे अलर्ट देण्यात आले आहे.

देशासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट आलेली आहे. राज्यातील विविध भागांतील तापमानात विक्रमी वाढ झालेली आहे. या उष्णतेच्या लाटेमुळे राज्यात गेल्या दोन महिन्यांत उष्माघातामुळे 25 जणांचा बळी गेला आहे, तर 374 जणांना उष्माघातची बाधा झाली आहे.

गेल्या 8 वर्षातील उष्माघाताच्या बळींचा हा उच्चांक ठरला आहे. नागपूरमध्ये उष्माघाताने बळी पडलेल्यांची संख्या सर्वाधिक असून आतापर्यंत 11 लोकांना जीव गमवावा लागला आहे. यावर्षी एप्रिलमध्ये तिसऱ्यांदा उष्णतेची लाट आली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भात नागरिक त्रस्त झाले आहेत.

तसेच मार्च महिन्यापासून राज्यातील उष्णतेचा पारा कायमच वाढत आहे. कधी उन्हाच्या झळा तर कधी अवकाळी पाऊस, यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बुधवारी मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पारा 43 अंशांच्या वर पोचल्यामुळे उन्हाचे चटके असह्य झाले आहेत. विदर्भासह राजस्थान आणि मध्यप्रदेशातही उष्णतेची लाट आली असून, पुढील पाच दिवस ही स्थिती कायम राहील असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

दरम्यान विदर्भात पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याची अनुभूती बुधवारी राज्यातील चाळीशीपार गेलेल्या तापमानावरून आली आहे. कोकण वगळता राज्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमान सरासरी 43 अंशावर होते. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक 45. 1 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

Leave A Reply

Your email address will not be published.