तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला

0

अमळनेर : तालुक्यातील डांगरी येथे अंगणात बसलेल्या राजेंद्र भिमराव शिसोदे यांच्यावर तिघांनी चाकूने वार केले. ही घटना दि. २५ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर तालुक्यातील डांगरी गावात प्रकाश उत्तमराव शिसोदे व राजेंद्र भीमराव शिसोदे हे त्यांच्या अंगणात खाट टाकून रात्री गप्पा मारत बसले होते. यावेळी त्यांच्या गल्लीत राहणारा नाना रामभाऊ शिसोदे हा तेथून दोन-तीन वेळा त्यांच्याजवळून चक्कर मारून गेला. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास नाना शिसोदे हा पुन्हा परत आला. त्याने राजेंद्र शिसोदे यांच्या
पाठीमागून येवून त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि अचानक हातातील चाकूने राजेंद्र याच्या पोटावर हातावर चाकूने सपासप वार केले. त्याला आवरण्यासाठी प्रकाश शिसोदे पुढे गेले असता त्यांच्यावर देखील वार केला. तसेच प्रकाश यांचा मुलगा सारंग शिसोदे यांच्याही पोटावर वार करून गंभीर जखमी केले. तसेच तिघांना तुम्हाला आज जिवंत ठेवत नाही म्हणत पळून गेला. तिघे जण जखमी झाल्याने तेथे जमलेले अशोक संतोष चोथमल, प्रशांत नीळकंठ चोथमल, शशिकांत लोटन चोथमल व इतरांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सारंग आणि राजेंद्र गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर प्रकाश शिसोदे यांच्यावर ग्रामीण रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. प्रकाश शिसोदे यांच्या जबाबवरून मारवड पोलीस स्टेशन ला आरोपी नाना शिसोदे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, सुनील आगोणे, सुनील तेली, धनंजय देसले यांनी दि. २६ रोजी पहाटे साडे चार वाजता डांगरी येथून संशयित नाना शिसोदे याला अटक केली आहे. आरोपीला अमळनेर येथील न्यायालयात हजर केले असता न्या. स्वाती जोंधळे यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.