रशिया-युक्रेन युद्धामुळे सोने ५१ हजारांच्या पार; चांदीही महागली

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

रशिया-युक्रेनमधील (Russia-Ukraine War) वाद चिघळत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Russia president Vladimir Putin) यांनी युक्रेनवर हल्ला करण्याची घोषणा केल्यानंतर जगभरातील बाजारांत त्याचा परिणाम दिसून येत आहे. शेअर बाजारात देखील मोठी घसरण पहायला मिळाली तर सोने आणि चांदी तेजीत आहे.

भारतात सोन्याच्या किमतीने गुरुवारी ५१ हजारांचा टप्पा पार केला. मल्टि कमोडिटी एक्स्चेंजवर ((MCX) गोल्ड फ्यूचर्समध्ये २ टक्के वाढ होऊन दर प्रति १० ग्रॅम ५१,३९६ रुपयांवर पोहोचला. चांदीही महागली असून प्रति किलो दर ६५,८७६ रुपयांवर गेला आहे. या वर्षातील हा उच्चांकी दर आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार,  गुरुवारी शुद्ध सोन्याचा म्हणजे २४ कॅरेटचा दर ५१,४१९ रुपये (प्रति १० ग्रॅम) होता. २३ कॅरेट सोने ५१,२१३ रुपये, २२ कॅरेट सोने ४७,१०० रुपये, १८ कॅरेट सोने ३८,५६४ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ३०,०८० रुपये होता. चांदी प्रति किलो ६६,५०१ रुपयांवर पोहोचली आहे.

काल २३ फेब्रुवारी बुधवार रोजी चांदीचा दर ६४,२०३ रुपयांवर गेला. तर शुद्ध सोन्याचा दर काल बुधवारी ५० हजारांवर जाऊन बंद झाला होता. आज सोने आणि चांदी दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने तेजीत

आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति औंस सोन्याचा दर १.६ टक्क्याने वाढून १,९३७ डॉलरवर पोहोचला आहे. याआधी जून २०२१ मध्ये सोन्याचा दर प्रति औंस १,९४८ डॉलरवर गेला होता. त्यानंतर पुन्हा एकदा सोन्याने उसळी घेतली आहे. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम)

सोने दर आणि युद्धाचा सबंध

जगात जेव्हा तणावाची परिस्थिती अथवा संकटे निर्माण होतात त्यावेळी त्याचा परिणाम शेअर बाजारावर होतो. शेअर बाजार कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होते. यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक करतात. यामुळे सोने तेजीत येते. सध्या अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सोने एका वर्षातील उच्चांकी स्तरावर पोहोचले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.