जळगाव ;- रामेश्वर कॉलनी परिसरातील हनुमान नगरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण ९६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून दिल्याचे उघडकिला आले. याबाबत शनिवार ४ मार्च रोजी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल गोपाल पाटील (वय-३६, रा. हनुमान नगर ) हे त्यांच्या काकाच्या मुलीचे लग्न असल्या कारणामुळे १ मार्च रोजी त्यांच्या कुटुंबासह घर बंद करून धरणगाव तालुक्यातील कोठळ गावाला गेले. घर बंद असल्याचे संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत ९ हजार रुपयाची रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण ९६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. घरात चोरी झाल्याचे शेजारी राहणारा मावस भाऊ योगेश महाजन यांनी फोन करून सांगितले. त्यानुसार विशाल पाटील हे शनिवारी ४ मार्च रोजी घरी येऊन पाहणी केली असता घरातील सामान अस्ताव्यस्त दिसून आले. तर घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून बाजूला ठेवलेले होते. त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी ४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.