मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मनोरंजन क्षेत्रातून मोठी बातमी आहे. अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान हिला ईडीची नोटीस आली आहे. तुलसियानी ग्रुप नावाच्या रियल इस्टेट कंपनीत झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे.
गौरी ही या कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. 2015मध्ये गौरीला या ग्रुपची ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आलं होतं. या कंपनीने बँक आणि गुंतवणूकदारांचे सुमारे 30 कोटी रुपये थकवले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे गौरी खान हिलाही चौकशीला बोलवण्यात आलं आहे.
हे प्रकरण 2023मध्ये सर्वप्रथम उघडकीला आलं. ही कंपनी लखनऊ येथील सुशांत गोल्फ सिटीमध्ये एक प्रकल्प उभारत आहे. मुंबईत राहणाऱ्या एका माणसाने 2015मध्ये या प्रकल्पात 85 लाख रुपयांची गुंतवणूक करून फ्लॅट बुक केला होता. मात्र, पूर्ण रक्कम भरूनही त्याला फ्लॅट दिला गेला नाही. त्यामुळे त्याने तुलसियानी समूह आणि गौरी खान यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. गौरी खान ही या प्रकल्पाची अॅम्बेसेडर असल्यानेच मी या प्रकल्पात गुंतवणूक केली होती, असं तक्रारदाराचं म्हणणं आहे.