पेणमध्ये बाप्पांच्या मूर्तीवर ज्वेलरीचा साज

0

 

पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

कच्च्या गणेशमूर्तींवर विविध प्रकारची रंगसंगती आणि डिझाईन ज्यावेळी मूर्तिकार काढतो, त्यावेळी त्या मूर्तीला खर्‍या अर्थाने वेगळाच साज चढतो. या योग्य रंगसंगती आणि डोळ्यांच्या आखणीमुळे पेणच्या गणपतींना जगभरात विशेष मागणी आहे. या रंगसंगतीवर आकर्षित होउन गणेशभक्त पेणचेच गणपती विकत घेण्यासाठी आग्रह धरत असतात. त्यातच आता गणेशमूर्तीला परिधान करण्यात येणार्‍या खर्‍या खुर्‍या धोतर, शेला, फेटा आणि ज्वेलरीवर गणेशभक्त आकर्षित होत आहेत. पेण व विविध ठिकाणी बाप्पांच्या मूर्तीवर या ज्वेलरीचा साज चढला आहे. अधिक श्रावण हा अतिरिक्त आलेल्या महिन्यानंतर यंदाचा गणेशोत्सव अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपल्याने मूर्तिकारांकडून बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरविण्याची लगबग गणेशशाळांमध्ये दिसून येत आहे.

कोकणातील महत्वाच्या सणांपैकी महत्वाचा सण म्हणून ओळखल्या जाणार्‍या गणेशोत्सवाला अवघा एक दिवस शिल्लक असल्याने गणेशोत्सवाची लगबग आता प्रत्येक गणेश भक्तांच्या घरामध्ये दिसू लागली आहे. गणेश भक्तांसाठी विविध प्रकारच्या मूर्ती देखील बाजारपेठेत काही दिवसांपूर्वीच विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत. दगडूशेठ, लालबाग, चिंचपोकळी, चिंतामणी अशा विविध प्रकारच्या नावांनी या गणेशमूर्ती प्रसिद्ध असल्या तरी या गणपतींच्या मूर्ती अधिक मोहक दिसण्यासाठी आणि गणेशभक्ताला म्हणजेच ग्राहकाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मूर्तिकार या मूर्तीवर विविध प्रकारचे हिरे, मोती लावून त्यावर ज्वेलरीचा एक प्रकारे साज चढवतात आणि त्यामुळे ज्वेलरी लावलेल्या हिरेजडित मूर्तीना गणेशभक्त अधिक पसंती देत असून अशा मुर्तींना बाजारपेठेत दरवर्षी मागणी वाढू लागली आहे.

मूर्ती खरेदी करताना थोडे पैसे जास्त गेले तरी चालतील पण आम्हाला हिरेजडित मूर्तीच पाहिजे असा आग्रह आजकाल ग्राहकांकडून केला जात आहे. एवढेच नव्हे तर कापडाचे धोतर लावणे, कानातील डूल, शेला, मोरपीस अशा विविध प्रकारच्या मूर्तीच्या सजावटीने नटलेले बाप्पा ग्राहकांच्या अधिक पसंतीस उतरला आहे. यावर्षी अशा प्रकारच्या आत्तापर्यंत हजारो गणेशमूर्ती विकल्या गेलेल्या असून आजही या मूर्तीना मागणी वाढत आहे, परंतु आता उरलेला एक दिवस, वेळेचा अभाव आणि वाढती मागणी याची सांगड घालता येत नसल्याने ग्राहकाला दुखविण्याची इच्छा नसतानाही आम्ही त्यांना अशा प्रकारच्या मूर्ती देऊ शकत नाही याची खंत पेण येथे गणेश मूर्तीकार विनय पाटील यांनी व्यक्त केली.

सध्या बाजारात अशा ज्वेलरीने साज चढविलेल्या मूर्ती ५ हजार रूपयांपासून ५० हजार रूपयांपर्यंत विकल्या जात आहेत. यामध्ये २ फुटापासून ५ फुटापर्यंत गणपतीच्या मुर्तीचा समावेश होतो. या पेक्षा अधिक पैसे घ्या पण आम्हाला अशा प्रकारची मूर्ती तयार करून द्या अशी ग्राहकांची आग्रही विनंती असते. त्यामुळे बाप्पाच्या मूर्तीवर ज्वेलरीचा चढविलेला साज आणि त्याच वाढती मागणी हे प्रकर्षाने जाणवत आहे.

गणेशोत्सव दोन दिवसांवर आल्याने चित्रशाळांमध्ये बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरविण्याची लगबग अंतिम टप्प्यात आहे. विविध प्रकारच्या देखण्या मूर्ती गणपती चित्रशाळांमध्ये तयार झाल्या आहेत. एकीकडे भातशेतीची गडबड सुरू असताना गणेशमुर्ती बनविण्याकडेही विशेष लक्ष दिले जाते. पेणमधील गणपती मूर्तींना तर जगाच्या कानाकोपऱ्यात विशेष मागणी असते.

‘‘यापूर्वी आम्ही रंगकामानेच मूर्तीचे दागिने, धोतर, शेला, फेटा आदी गोष्टी करायचो. मात्र हळूहळू आपल्या कलेला वेगळे वळण देऊन बाजारातून कापड खरेदी करून आणि नॉवेल्टी मधुन ज्वेलरी खरेदी करून धोतर, शेला, फेटा, हिरे, मोती आणून ही बाप्पाची मूर्ती अधिक सुबक आणि देखणी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न एवढा यशस्वी झाला की आता आमचे ग्राहक गणेशभक्त अशा प्रकारच्या मूर्तींचीच मागणी करू लागले आहेत. या वर्षीच पुढील वर्षीच्या मूर्तींची ऑर्डर ग्राहक देऊन जात असल्याने अशा प्रकारच्या मूर्तींना किती मागणी आहे हे स्पष्ट होते.’’- विनय पाटील , मूर्तिकार – पेण

‘‘जो बाप्पा आपल्याला आयुष्यभर मनापासून जे मागेल ते देत असतो, त्याची आपण मनोभावे पूजा अर्चा करत असतो, त्याच बाप्पाचे आगमन वर्षातून एकदा आपल्या घरी होत असेल तर त्यासाठी खर्चाचा विचार न करता आम्ही अधिकाधिक सुबक, देखणी मुर्तीची मागणी मूर्तीकारांकडे करत असतो. मुर्तीकाराने बनवलेली खर्‍या कापडाचे धोतर, शेला, फेटा परिधान केलेली आणि खरे हिरेजडित मुकुट तयार केलेल्या मूर्तीला आम्ही अधिकाधिक पसंती देत आलो आहोत.’’ – अजय घरत, पनवेल

Leave A Reply

Your email address will not be published.