बांधकाम कंत्राट देण्याच्या नावाने २१ लाखात फसवणूक

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

चाळीसगाव येथे बांधकामाचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोघांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव येथील प्रविण जयसिंग ठोके हे जळगाव येथील नितिन काबरे यांचे भागीदार आहेत. त्यांना पुण्यातील टेराफर्मा सुपरस्ट्रॅक्ट कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक प्रतीत शहा व त्याचा एजंट दीपक कुमार मंडल (रा. प. बंगाल) यांनी गोव्यातील विमानतळाच्या बांधकामाचे कंत्राट मिळवून देण्याचे आमीष दाखवले. हे कंत्राट टेराफर्मा कंपनीने ३५० कोटीत घेतले असून, त्या कंपनीला सब कॉन्ट्रॅक्टर कंपन्यांची गरज आहे, असे सांगत ठोके यांच्याकडून सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करण्यासाठी अनामत रक्कम म्हणून २० लाख रूपये घेतले. तसेच एजंट दीपक मंडल याला अडीच लाख रूपये दिले. यातील एक लाख रूपये त्याने नंतर परत केले.

मात्र काही काळानंतर प्रतीत शहाच्या कंपनीला केवळ दीड कोटी रूपयाचे काम मिळाल्याचे समोर आले. यामुळे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो असे भासवून ठोेके यांच्याकडून २१ लाख रूपयांची फसवणूक करण्याचे उघडकीस आले. या प्रकरणी कंत्राटदार प्रवीण ठोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here