लोकशाही न्यूज नेटवर्क
वेगवेगळे नफ्याचे आमिष दाखवून नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघांना नवी मुंबई सायबर पोलिसांनीघाटकोपर मधून अटक केली आहे. तांत्रिक तपासात ५८ बँक खाती समोर आली असून, ३२ कोटी ६६ लाखांची रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. यामध्ये अजून संशयितांचा समावेश असून राजस्थान पर्यंतचे काही धागेदोरे सायबर पोलिसांच्या हाती लागले आहेत.
क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून फसवणूक झाल्याची तक्रार नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे काही दिवसांपूर्वी नोंदविण्यात आली होती. त्यामध्ये तक्रारदार यांची ऑनलाईन ६ कोटी ६२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा गुन्हा दाखल होताच उपायुक्त अमित काळे, सहायक पोलिस आयुक्त विशाल नेहूल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर शाखेचे वरिष्ठ निरीक्षक गजानन कदम यांनी सायबर सेलच्या पथकाद्वारे तपासाला सुरवात केली होती. त्यामध्ये सायबर सेलच्या महिला पोलिस शिपाई पूनम गडगे यांनी तांत्रिक तपासावर भर दिला होता.
यामध्ये त्यांनी तक्रारदारांची रक्कम लुटण्यासाठी गुन्हेगारांनी वापरलेले ई वॉलेट, बँक खाती तपासली. त्यामध्ये हाती आलेल्या माहितीद्वारे घाटकोपर परिसरात दोघांच्या हालचाली असल्याचे समोर आले. त्याठिकाणी सापळा रचून बाळू सखाराम खंडागळे (४२) व राजेंद्र रामखिलावन पटेल (५२) यांना अटक केली. त्यांच्या चौकशीत व तांत्रिक तपासात गुन्ह्यासाठी वापरलेली तब्बल ५८ बँक खाती समोर आली. या बँक खात्यांचे एटीएम कार्ड, चेकबुक त्यांच्या इतर सहकाऱ्यांकडे असल्याने त्यांच्याकडून रक्कम काढली जाण्याची भीती होती. यामुळे पोलिसांनी तातडीने बँकांशी संबंध साधून सर्व खाती गोठवली असता त्यामध्ये तब्बल ३२ कोटी ६६ लाखांची रोकड असल्याचे समोर आले.
नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या या रॅकेटचे धागेदोरे राजस्थान पर्यंत पोहोचले आहे. पटेल हा साथीदारांद्वारे वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडून त्यांचे एटीएम कार्ड, चेक इतर साथीदारांपर्यंत पोहचवायचा . तर फोनवरून नागरिकांशी संपर्क साधून वेगवेगळे आमिष दाखवून संबंधित खात्यात रक्कम भरण्यास सांगणारे त्यांचे साथीदार आहे. त्यानुसार या रॅकेटचा उलगडा करण्यासाठी सायबर शाखेचे निरीक्षक गजानन कदम यांचे पथक अधिक तपास करत आहे.