विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची सुखरूप सुटका

0

यावल :- हिंगोणा येथील शेतातील २५ फूट खोल विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला सुखरुप काढण्यात वन विभागाला यश आले असून या कोल्ह्याला बाहेर काढल्यानंतर त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

तालुक्यातील हिंगोणा येथील शेतातील २५ फुट खोल विहिरीत कोल्हा पडल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाला कळवली. त्यानंतर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फंटागरे व कर्मचारी जागेवर पोहोचले. ही विहिर २५ फुट खोल असून भोवताली केळी दाट झाडी तसेच कठडे नसल्याने हा कोल्हा विहिरीत पडला. विहिरीत पाणी नसल्याने तो सुरक्षित होता. सुरुवातीला जाळे टाकुन बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. बरेच प्रयत्न करूनही कोल्हा वन विभागाच्या प्रयत्नांना दाद देत नव्हता. रात्र असल्याने व माती धसण्याची शक्यता असल्याने विहिरीत उतरणे कठीण होते. तसेच विहिरीत उतरल्यास वन्य जीवाकडून हल्ला होण्याचा धोका होता. शेवटी रात्री १ वाजता प्राण्याने वर यावे, अशी व्यवस्था करत वन कर्मचारी माघारी परतले. त्यानंतर कालांतराने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली पण तेथे कोल्हा दिसला नाही. मात्र शोध मोहीम सुरू होती. दरम्यान, परिसरातील शेतकऱ्यांना सूचना करुन विहिरीत कोल्हा दिसल्यास लगेच वन विभागाला कळवण्याचे आवाहन केले होते.

दरम्यान, ३१ मार्चच्या सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फंटागरे यांच्या आदेशानुसार बि. बि. गायकवाड, गणेश चौधरी, सचिन चव्हाण व वाईल्ड ल्यॅड्स कंझर्वेशन फाऊंडेशनचे संचालक अजिंक्य भांबुरकर यांचा चमू कोल्हा शोधण्यासाठी विहिरीजवळ गेला. जवळपास तासा भरानंतर कोल्हा विहिरीतील मातीच्या बिळातून बाहेर आलेला दिसला. लगेच पथकाने पिंजरा चारी बाजूने दोराने बांधून तो विहिरीत सोडला. तरीही कोल्हा पिंजऱ्यात आला नाही व बिळात लपून बसला. शेवटी जीवाची पर्वा न करता शिडीच्या सहाय्याने नाकेदार बि. बि. गायकवाड व चालक सचिन चव्हाण विहिरीत उतरले व जाळी टाकून कोल्ह्याला पकडले व पिंजऱ्यात टाकले. त्यानंतर पिंजरा वर काढून कोल्ह्याला जीवदान दिले. त्यानंतर वड्री धरणाजवळच्या वन जंगलात त्यास सोडण्यात आले. उपवसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या मार्गदर्शनात ही मोहिम वन कर्मचाऱ्यांनी राबवली.

Leave A Reply

Your email address will not be published.