सात दिवसात चोरीचा छडा, ४ लाखांचा ऐवज हस्तगत

0

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरातील कागझीपूरा भागातील बंद असलेल्या घरातून तब्बल अडीच लाख रुपये रोख व ४३ ग्राम सोने लंपास केल्याची घटना घडली होती. दरम्यान  एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने अवघ्या काही दिवसात चोरट्यांच्या मुसक्या आवळत ४ लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे.

दाराला छिद्र पाडून प्रवेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  कागजीपूरा भागातील खालीद अहमद रफिक अहमद हे दि. १५ नोव्हेंबर २०२३ ते १७ नोव्हेंबर पर्यंत दोन दिवस अमरावती येथे आपल्या नातेवाईकांच्या लग्नाकरिता गेले होते. ते १७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी  ७.०० वाजता परत आले. दरम्यान  घरातील २ लाख  ३८ हजार ६४२ रुपये किमतीचे ४३ ग्राम सोन्याचे दागिने व २ लाख ५० हजार रोख रक्कम असे एकूण ४ लाख ८८ हजार ६४२ रुपयांचा ऐवज चोरांनी घराच्या मागील दाराला छिद्र पाडून अलगद दरवाजा उघडून घरात प्रवेश करून चोरी केल्याचे लक्षात आले होते.

 

दागिने व रक्कम हस्तगत

दरम्यान एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे हे तपास करीत असताना घटनास्थळावरील परिस्थितीवरुन फिर्यादी यांचे जवळील व माहितगार व्यक्तीने चोरी केली असल्याची शक्यता दिसून आल्याने कागझीपूरा येथे राहणारे फिर्यादी यांचे जवळील आझाद शेख शब्बीर चौधरी (वय २३, धंदा चालक), मेहंदी रजा शेख अली अहमद (वय ३५, धंदा कारपेंटर), कलीम शेख रहीम (वय ३७, धंदा फिटर)  सर्व रा.कागझीपूरा यांच्यावर संशय आल्याने त्यांची चौकशी केली असता त्यांच्यासह कलीम शेख यांचा सासरा आसिफ रा.मालेगाव असे एकूण चार जणांनी चोरी केली असल्याचे कबूल केले. तर चौथा आरोपी आशीफ हा फरार आहे.  तसेच फिर्यादी खालिद रफीक शेख यांच्या घरातील दिवाण व कपाटातील ४३ ग्रॅम सोन्याचे दागिने व दोन लाख पन्नास हजार रुपये चोरून नेल्याचे कबूल केले. त्यात आरोपींकडून ४३ ग्रॅम सोन्याचे दागिने एक लाख रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात यश आले आहे.

असा आला संशय 

पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये चोरांनी चोरी करताना फिर्यादीच्या घरातील दुसऱ्या कोणत्याही वस्तू अस्तव्यस्त न केल्याने चोरी ही जवळच्या व्यक्तीने केली असल्याचा संशय बळावला असल्याचे सांगितले.  त्यातूनच पोलिसांना खरे आरोपी शोधून काढण्यात यश मिळाले. सदर कारवाईत सहभागी पो.हे. काॅ. अनिल पाटील, सुनील लोहार, विलास पाटील, जुबेर खाटीक, पोलीस नाईक अकील मुजावर, पोलीस शिपाई प्रशांत पाटील, पंकज पाटील, पोलीस चालक हेमंत घोंगडे, गृह रक्षक दलाचे दिनेश पाटील आदींनी तपासात अनमोल सहकार्य केले.

सर्वत्र कौतुक

संबंधित आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असून फरार आरोपी आशीफ याचा शोध घेणे सुरू आहे. एरंडोल पोलीस स्टेशनच्या ह्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.