मानवी विकास निसर्ग भकास

0

लोकशाही विशेष लेख

“पर्यावरण”. काय बोलणार या विषयावर आपण? हेच ना की पर्यावरण धोक्यात आले आहे. दिवसेंदिवस पर्यावरणात बदल घडत आहे. अजून काय बोलणार ? काहीच नाही…खरं तर रोज पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. अशा प्रकारच्या बातम्या आपण रोज ऐकत असतो, वाचत असतो. पण पर्यावरणाची बिघडलेली परिस्थिती सुधारणं कसं शक्य होईल, ती सुधारणा कशी करायची? याबद्दल कुणी फारसा विचार करत नाही. आणि केला तरी तो त्या वेळेपुरता मर्यादीत असतो असं म्हणायला हरकत नाही. खरच…! बिघडलेल्या या पर्यावरणात सुधारणा होईल का? त्यामध्ये झालेली हानी परत भरून निघेल का? असे प्रश्न मला पडतात.

या सर्व गोष्टींना जबाबदार एक प्राणी आहे आणि तो म्हणजे माणूस ( मनुष्यप्राणी). आजच्या जागतिकीकरणाच्या या काळात प्रदूषणाने आपले साम्राज्य सगळीकडे पसरवले आहे आणि याचे सर्व दुष्परिणाम एकूणच पर्यावरणावर होत आहे. दिवसेंदिवस माणसाच्या गरजांमध्ये वाढ होत चालली आहे आणि याचा परिणाम म्हणजे वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण यांमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होत आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळायला सुरुवात झाली ती औद्योगिक क्रांतीपासून. आज मोठ्या मोठ्या शहरांमधून स्वयंचलित वाहनांच्या संख्येमुळं वातावरणाच्या प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान येण्यापूर्वी लोक अतिशय साधेपणाने आयुष्य जगत होते. जास्त लोभ नव्हता आणि जास्त हावही नव्हती. पण जस जसे माणसाची दुसऱ्यांपेक्षा वरचढ होण्याची स्पर्धा सुरू केली.

प्रगतीच्या नावाखाली माणसांनी पर्यावरणाचा ऱ्हास करायला सुरुवात केली आणि खरं म्हणायचे तर पर्यावरणाचे संतुलन बिघडवण्यास माणसाची वाढत गेलेली हाव हेच सर्वात मोठे कारण आहे. आपण आज ज्या प्रकारे जगतो आहे, ज्याप्रमाणे पृथ्वीवरील सिमीत असलेले साधन झपाट्याने संपवतो आहे ही भविष्यातील एक मोठ्या संकटाची चाहूल आहे. ह्या संकटाची सुरुवात झालेली आहे हे आपल्याला बातम्या बघताना समजू शकेल. कमी होत जाणारी पाण्याची पातळी, पावसाची अनियमितता, वाढणारा दुष्काळ, वारंवार येणारी वादळे हे सर्व पर्यावरणाच्या असंतुलनाचे परिणाम आहेत. माणसे जंगलतोड करून शहरे बसवू लागल्यानं जंगलातील प्राण्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे. गेल्या काही दशकात अनेक प्राणी जाती दुर्मिळ झाल्या आहेत किंवा नष्ट झाल्या आहेत.
प्रदूषण हा पर्यावरणासाठी खूप मोठा धोका आहे आणि हे प्रदूषण फक्त माणूसच करत आहे.

प्रदूषणाचे परिणाम माहीत असूनही प्रदूषण कमी करण्यासाठी आपण कोणतेच ठोस पाऊल उचलत नाही. पर्यावरणाला वाचवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. कारण आपण पूर्णपणे पर्यावरणावर अवलंबून आहोत. यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे आपण वृक्षतोड थांबवून जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे. झाडे लावल्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल व पर्यावरणाचा ह्रास कमी होईल. शहरांमध्येसुद्धा झाडे लावण्यासाठी जागा ठेवली गेली पाहिजे व शाळांच्या मदतीने तिथे झाडे लावून विद्यार्थ्यांना झाडांचे संगोपन करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. यामुळे येणारी पिढी पर्यावरणाबाबत जागरूक राहील.तसेच वाहनांमुळे होणारे प्रदूषण सुद्धा कमी करण्यावर भर दिला पाहिजे. थोड्याच अंतरावर जायचे असेल तर गाडीचा उपयोग न करता पायी जावे किंवा साईकल चा उपयोग करावा. कारखान्यांवरसुद्धा प्रदूषण संबंधी कारवाई केली गेली पाहिजे आणि योग्य पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले गेले पाहिजे.

ऊद्योगातून जलवायू, कचरा प्रदूषण होणारच नाही याची काळजी घेतली पाहिजे. वाहने सौरउर्जेवर, बॅटरीवर किंवा सीएनजीवर चालवावी. कोळसा आधारित वीजनिर्मिती कमी करून सौर, जल, वायू ऊर्जा, नैसर्गिक व बॉयोगॅस ऊर्जा अशा अपारंपरिक ऊर्जास्रोतांकडे आपण वळलो पाहिजे. एलईडी दिव्यांचा सर्वत्र वापर व्हावा आणि वीज बचत करावी. जंगले वाचवली पाहिजे. काँक्रिटची घरे व रस्ते तापू नये म्हणून त्यांना पांढरा रंग देतात, त्याचा वापर झाला पाहिजे. गाव तिथे तलाव आणि लहान धरणे सर्वत्र बांधावी, पावसाचे पाणी अडवावे व जिरवावे. जगाची ७.१९‌ बिलीयन एवढी मोठी लोकसंख्या सर्व नैसर्गिक संसाधनांना संपवित आहे. त्यामुळे तिला कमी करणे गरजेचे आहे. अशा अनेक उपाययोजना आज राबविल्यास हळूहळू अनेक वर्षापर्यंत पर्यावरणाचे झालेले नुकसान भरून निघेल.
निसर्गाचे एक चक्र आणि साखळी आहे. त्यातील एक साखळी तुटली तर दुसरी आणि पुढे ती तुटत जाते. आपण जंगले तोडली. त्यामुळे जैवविविधता कमी झाली. प्राणवायू कमी झाला. कारखानदारी वाढविली. प्रदूषण वाढले. तापमान वाढले.

नैसर्गिक संकटे वाढली इत्यादी आज पर्यावरणाच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. वायू, जल, भूमी अशा जीवनावश्यक नैसर्गिक घटकांचे आपण प्रदूषण करून आपले मरण ओढविले आहे. शहरातील पाण्यात घाण, कचऱ्याचे ढिगारे, हाच कचरा पुढे नाल्यातून नदीत जातो आणि समुद्रात साचतो. यामुळे जल जैव विवधिता ढासळते. सागरी क्षारता व आम्लता वाढते आणि याचा दूरगामी परिणाम सागरी प्रवाहावर होतो आणि या प्रवाहाचा परिणाम तापमान वाढीवर होतो असे हे दुष्टचक्र सुरू होते आणि पर्यावरणाला दूषित करते. प्रदूषणाला जितके उद्योग जबाबदार तितकेच लोकसुद्धा जबाबदार आहेत. उन्हापासून बचाव करा अशा जाहिरातींनी काही साधणार नाही. लोकांची मानसिकता बदलली तरच सरकारही बदलेल. आता आपण कोणत्याही स्थितीत पर्यावरणाचा ऱ्हास थांबविलाच पाहिजे नाहीतर पुढच्या पिढीचे भविष्य अंधकारमय आहे.

कारण माणूस कितीही मोठा झाला, तरी शुद्ध हवा आणि पाण्याशिवाय त्याला जगताच येणार नाही. नेमक्या याच सत्याकडे डोळेझाक झाली आहे. व्यापारीकरणाच्या नादात आपण वायू आणि जल प्रदूषण किती मोठ्या प्रमाणात केले आहे, याची कल्पनादेखील करवत नाही. थोडक्यात, माणूस भौतिक सुखांच्या आहारी गेला. त्याची हीच लालसा घातक ठरणारी आहे. या गोष्टींचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ यापूर्वीच येऊन गेली आहे. आता प्रत्येकाने कृती करणे आवश्यक आहे. निसर्गाचा मान राखून केलेला विकासच शाश्वत असेल. त्यातूनच जगणे सुंदर आणि संरक्षित होईल. जेव्हा पृथ्वीवरील सर्व देश, या देशातील सर्व लोक पर्यावरणाबद्दल जागरूक होतील तेव्हाच मानवाला निसर्गाच्या विनाशा शिवाय विकास करता येईल. तेव्हाच आपली पृथ्वी पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होईल.

हर्षल सोनार
जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.