वाळू माफियांचा हौदोस सुरूच : उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव जिल्ह्यातील वाळू माफ यांचा हौदोस सुरूच आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि त्यांच्या महसूल यंत्रणेची टीम तसेच जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या नाकावर टिच्चून वाळू माफियांचा वाळू तस्करी सुरूच आहे. जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस प्रशासन यांच्याकडून जेवढे निर्बंध वाळू तस्करी रोखण्यासाठी लावले जात आहेत, त्याची तमा न बाळकता निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार आणि तहसीलदार बनसोडे यांच्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. त्यात उपजिल्हाधिकारी कासार यांना डोक्यात रोड घुसल्याने ते रक्तबंबाळ झाले. त्यांच्या गाडीचीही तोडफोड केली गेली. घटनेचे वृत्त कळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी घटनास्थळी पोहोचले. तातडीने जखमी उपजिल्हाधिकारी कासार यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. सुदैवाने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. परंतु वाळू माफियांचा हिम्मत दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतच आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे वाळू तस्करीतून मिळणारे कोट्यावधी रुपये होय. ‘पैशाच्या जोरावर आम्ही काहीही करू शकतो’, असे वाळू माफियांना वाटते आणि आतापर्यंत त्यांचे काम फत्ते होत असल्याने आता प्रशासनाकडून लादण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे पाण्यात राहणाऱ्या माशाला पाण्याबाहेर काढले की जसा तो तडफडतो तशी अवस्था वाळू माफियांची झाली आहे. त्यांच्यावर वाळू तस्करीचे कडक बंधन लादले जात असल्याने ते चौताळले आहेत. फुकटचा मिळणारा पैसा मिळत नसल्यामुळे पैशाचा जोरावर पोसणाऱ्या गुंडांकरवी अशा प्रकारचे हल्ले केले जात आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी एरंडोल विभागाचे प्रांत अधिकारी यांच्यावरही असाच हल्ला झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर प्राणघातक हल्ला केला जातो, ही बाब अत्यंत गंभीर आहे. या गंभीर घटनेने ‘नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे रॉकेल माफी यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी रॉकेल तस्करीवर कारवाई करायला गेले असता त्यांच्यावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्यात आले होते’, या अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रमुखांनी जे पाऊल उचलले आहे, ते कौतुकास्पद आहे. प्रश्न वाळूच्या उपशाचा नाही; परंतु अवैध मार्गाने वारेमाप वाळूची तस्करी होत असल्याने एक तर शासनाचा महसूल बुडतो आहे. त्यापेक्षा जास्त घातक म्हणजे गिरणा आणि तापी नद्या अक्षरशा बोडक्या झाल्या केल्या जात आहेत. गिरणा व तापी नद्या या जळगाव जिल्ह्याच्या लाईफ लाईन असताना त्या वारेमात वाळू उपशाने उजाड होत असल्याने भविष्यात शेतीच्या सिंचना बरोबर पिण्याच्या पाण्याचे संकट जिल्ह्यावर उजाडणार आहे. हा प्रकार आताच रोखला गेला नाही तर जिल्ह्याचे वाळवंट होऊ शकते. म्हणून भविष्याच्या दृष्टीने सुद्धा विचार करून जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद हे वाळू तस्करी रोखण्यासाठी कडक पावले उचलत आहेत. त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठीशी संपूर्ण जिल्हा उभा राहण्याची गरज आहे. गेल्या अनेक वर्षापासून वाळू माफियांचा हा गोरख धंदा सुरू असल्यामागे राजकारण्यांचा हात असण्याने जिल्हा प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईला यश येत नव्हते. तथापि आताची जिल्हा प्रशासनाकडून तस्करी रोखण्यासाठी जी कडक कारवाई होतेय, त्यात राजकारण्यांचा हस्तक्षेप होत नाही ही एक चांगली गोष्ट आहे, असेच म्हणावी लागेल. “जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आप आगे बढो हम तुम्हारे साथ है” या तत्त्वाने जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले तर बोटावर मोजणारे गुंड माफियांना लगाम लावणे काही अवघड नाही.

रीतसर नदीतून आणलेल्या वाळूची लागलीच विल्हेवाट लावली जाते. शहरात आणून त्या वाळूला दंड करता येत नाही. तथापि शहरात चक्कर मारला असता काही ठिकाणी वाळूचे मोठमोठे ढिगारे दिसून येतात. हे सुद्धा बेकायदेशीर आहेत. त्याकडे सुद्धा जिल्हाधिकारी आणि त्यांच्या टीमने आपला मोर्चा वळवावा असे सुचवावेसे वाटते. एवढ्या प्रमाणात वाळूचे ढिगारे साठवणे बेकायदेशीर असताना ‘ते साठे कसे काय केले जातात?’ यावर सुद्धा कारवाई झाली तर अवैध वाळू तस्करीला प्रबंध बसेल आणि जळगाव सारख्या शहरात ‘खुलेआम साठे करणारे कोण सफेद झूट वाले आहेत’? याचा शोध आपोआप लागेल. उपजिल्हाधिकारी कासार यांच्यावर हल्ला करणारे वाळू माफिया अथवा त्यांनी पोसलेले गुंड जळगाव शहरापासून अगदी जवळच महामार्गावर मोटरसायकली व कार मध्ये येऊन हल्ला करतात, ही बाब अत्यंत गंभीर आहे. कायदा व सुव्यवस्थेला मोडीत काढणारी ही घटना म्हणता येईल. तेव्हा ज्या काही हल्लेखोरांना पकडले आहे. त्यांच्यावर पोलिसांकडून कडक कारवाई आणि हल्ल्या मागचा मास्टरमाईंड कोण आहे? याचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली, तरच ही मंडळी पुन्हा डोके वर काढणार नाही. कायद्यापुढे कोणीही श्रेष्ठ नाही. कायदा हातात घेऊन गुंडगिरीचा धुडगूस घालणाऱ्यांना अत्यंत कडक कलमे लावून धडा शिकवण्याची गरज आहे. अन्यथा या गुंडांमुळे जिल्ह्याची शांतता भंग होण्याचा धोका आहे. म्हणून हल्लेखोरांच्या मास्टरमाइंडला आधी ताब्यात घेणे गरजेचे आहे. तरच पुढचे काम सोयीचे होऊ शकते; अन्यथा प्रशासनावर गुंड हावी होतील यात शंका नाही…!

Leave A Reply

Your email address will not be published.