रुंधाटी परिसरात बिबट्याचा मेंढपाळांच्या कळपावर हल्ला

0

पातोंडा, ता. अमळनेर : तापी काठावरील रुंधाटीच्या शेतशिवारात सोमवारी रात्री मेंढपाळांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून एका मेंढीची बळी घेतल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत. शेतकऱ्यांनी ही घटना वन विभागाला कळवली असता रात्रीच पारोळा व अमळनेर येथील वन कर्मचारी दाखल झाले होते..

रुंधाटी, मठगव्हाण, मुंगसे, जळोद व पातोंडा परिसरात शेतकऱ्यांच्या शेतात हरभरा, ज्वारी, मका, गहू आदी पिके आहेत. रात्र पाळीला शेतकरी शेतात पाणी भरण्यासाठी जात आहेत. तर रुंधाटी परिसरात मेंढपाळ मेंढ्यांचा कळप घेऊन बसले आहेत. सोमवारी रात्री बिबट्यासदृश प्राण्याने या मेंढ्यांवर हल्ला केला आणि एका मेंढीचा बळी घेतला. त्यामुळे मेंढपाळ भयभीत झाले आहेत. ही घटना त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना कळवली. शेतकऱ्यांनी लागलीच वन विभागाला ही माहिती दिली.

त्यानंतररात्री उशिरा वन कर्मचारी दाखल होऊन त्यांनी परिसरात गस्त घातली. रात्र बरीच झाल्याने वन कर्मचाऱ्यांना परत जावे लागले. या वेळी शेतकरी व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. मंगळवारी सकाळी वन कर्मचाऱ्यांनी पुन्हा रुंधाटी शिवारात शोधमोहीम सुरु केली असता त्यांना बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्या. दरम्यान, शेतकऱ्यांनी शेतात जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे. वन विभागाचे अधिकारी शशिकांत देसले, वनपाल पी. जे. सोनवणे, रामदास वेलसे, वनमजूरांनी घटनास्थळी पाहणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.