ED कडून Amway कंपनीची ७५७ कोटींची मालमत्ता जप्त

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

देशात सध्या ईडीकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई होतांना दिसत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात FMCG Amway India ची सुमारे ७५७.७७ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार Amway फर्मवर मल्टी लेव्हल मार्केटिंग घोटाळा केल्याचा आरोप आहे.

यावेळी ईडीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये तामिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यातील अ‍ॅम्वेची जमीन आणि कारखान्याची इमारत, प्लांट आणि मशिनरी, वाहने, बँक खाती आणि मुदत ठेवी यांचा समावेश आहे.

यापूर्वी, केंद्रीय तपास एजन्सीने Amway च्या ३६ वेगवेगळ्या खात्यांमधून ४११.८३ कोटी किमतीची स्थावर आणि जंगम मालमत्ता त्याचबरोबर ३४५.९४ कोटी बँक बॅलन्स तात्पुरती स्वरुपात जप्त केले होते.

दरम्यान ईडीने दिलेल्या माहितीनुसार,अ‍ॅम्वे इंडियाकडून लोकांना सांगितले जात होते की, नवीन सदस्य जोडल्यानंतर कसे ते श्रीमंत होऊ शकतात. याच्या माध्यमातून कोणत्याही उत्पादनाची विक्री केली जात नव्हती. ईडीने म्हटले की, काही उत्पादनाचा वापर दाखवण्यासाठी केला जात होता की, अ‍ॅम्वे कंपनी डायरेक्ट सेलिंगचे काम करते.

अ‍ॅम्वेचे देशभरात ५.५ लाख डायरेक्ट सेलर्स व सदस्य होते. तपासात स्पष्ट झाले की, अ‍ॅम्वे कडून पिरॅमिड फ्रॉड केले जात आहे. एकदा सदस्य झाल्यानंतर त्याच्या माध्यमातून दुसरे सदस्य जोडले जात होते. त्यांना सांगण्यात येत होते की, त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या सदस्यांमार्फत त्यांना पैसे मिळू शकतात व ते श्रीमंत होऊ शकतात.

ईडीकडून सांगितले गेले की, या कंपनीकडून जे प्रॉडक्ट्स विक्री केले जात होते, त्याची किंमत दुसऱ्या लोकप्रिय ब्रांड्सच्या तुलनेत खूप अधिक होती. कंपनीकडून सामान्य लोकांना मेंबर केले जात होते व त्याबदल्यात मोठी रक्कम वसूल केली जात असे. त्याचबरोबर अधिक नफ्याचे आमिष दाखवून त्यांना कंपनीची उत्पादने खरेदी करण्यास सांगितले जात होते. अशा पद्धतीने सामान्य लोकांनी आपल्या कष्टाचे पैसे कंपनीत गमावले तर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी श्रीमंत बनले.

Leave A Reply

Your email address will not be published.