जिल्ह्याच्या सर्वसमावेशक व‍िकासाला सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
पालकमंत्र्याच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनाचे ध्वजारोहण
जळगाव, शेतकरी, वंच‍ित, दुर्लक्ष‍ित घटक, सर्वसामान्य नागर‍िक यांच्या जीवनात शासकीय योजना व  मदतीच्या रूपाने नवी पहाट आणण्याचे काम शासन करत आहे. ‍ज‍िल्ह्यात पायाभूत सुव‍िधांचे जाळे न‍िर्माण करण्यात येत आहे. यापुढेही  जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाला सर्वोच्च प्राधान्य  राहणार असल्याची ग्वाही स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे द‍िली.
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी शुभेच्छा संदेशात पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित,  पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, महानगर पालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, परीव‍िक्षाधीन ज‍िल्हाध‍िकारी अर्पीत चव्हाण, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, प्रांतध‍िकारी महेश सुधळकर, तहसीलदार व‍िजय बनसोडे तसेच विविध विभागाचे विभागप्रमुख तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात सध्या “मेरी मिट्टी – मेरा देश” म्हणजेच “माझी माती – माझा देश” हे अभियान राबविण्यात येत आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्य सैनिकांचा आणि शूरवीरांचा सन्मान करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. असे नमूद करून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, शेतकरी हा आपल्या राज्याचा मुख्य कणा आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासन विविध योजना राबवीत आहेत. या शेतकऱ्यांच्या पाठिशी आमचे सरकार खंबीरपणे उभे आहे.
एक रूपयात पीक व‍िमा योजनेत साडेचार लाख शेतकरी सहभागी
फक्त एक रूपयात प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जिल्ह्यात शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. जिल्ह्यात ४ लाख ५४ हजार शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. जिल्ह्यात मागील वर्षभरात २१ हजार शेतकऱ्यांना नव्याने ठिबक सिंचनासाठी सबसिडी दिली. यामुळे २० हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली आले. ५० हजार शेतकऱ्यांना विम्याचे ३४ कोटी रूपये वाटप करण्यात आले आहेत‌. जवळपास एक हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक जास्त कांदाचाळी जळगाव जिल्ह्यात निर्माण करण्यात आल्या. असे ही पालकमंत्र्यांनी यावेळी सांग‍ितले.
*मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टप्पा-२ योजना-*
पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना दिवसा नियमित व भरवशाचा वीजपुरवठा व्हावा या उद्देशाने “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टप्पा-२”  ही योजना शासन राबवत आहे. या योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यातील १६५ उपकेंद्रामध्ये एकूण १०६२ मेगावॅट क्षमतेपर्यंत सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प स्थापित केला जाणार आहे. याकरिता ४ हजार नऊशे एकर शासकीय जमिनीचा प्रस्ताव मंजूरीच्या प्रक्रियेत आहे.
                                                                             ऑगस्ट २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीत जिल्ह्यात विविध नैसर्गिक आपत्तीत १ लाख ३२ हजार शेतकऱ्यांचे ७६ हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाले. अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासकीय मदतीच्या रूपाने ३१ कोटी ७१ लाख रूपये वितरित करण्यात आले आहेत.
सामाज‍िक न्यायासाठी काम
गरीब, गरजू, वंचितांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ देण्यात येत आहेत. असे नमूद करून पालकमंत्री म्हणाले,  जिल्ह्यातील ५१ हजार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व फ्री-शीप योजनेचा लाभ देण्यात आला. वसतिगृहाबाहेर राहून शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या ९७४ विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत ७ कोटी २३ लाख रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ११० तृतीयपंथीयांना ओळखपत्र देण्यात आले आहे.‌ ८ हजार उसतोड कामगारांना ओळखपत्र देण्यात आलेले आहेत.
रस्त्यांच्या कामांना प्राधान्य
ज‍िल्ह्यातील रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हायब्रीड अन्युटी अंतर्गत ३६५ किलोमीटरचे रस्त्यांसाठी सुमारे ९०० कोटी निधीतून कामे पूर्ण करण्यात आले असून जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम  व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. शहरातील शिवाजीनगर,  भडगाव तालुक्यातील कजगाव व रावेर तालुक्यातील निंभोरा, बोदवड तालुक्यातील नाडगाव येथील १०० कोटी निधीतून उड्डाणपूल पूर्ण करण्यात आले आहेत. असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांग‍ितले.
आद‍िवासी घटकांच्या उन्नतीसाठी काम –
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, आदिवासी घटकांच्या उन्नतीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात यावल तालुक्यात डोंगरकठोरा व अमळनेर तालुक्यात दहिवद येथे मध्यवर्ती स्वयंपाकगृहांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. या मध्यवर्ती स्वयंपाकगृहाच्या माध्यमातून जिल्ह्यातील १४ शासकीय आश्रमशाळा, १२ वसतिगृहातील निवासी आदिवासी विद्यार्थ्यांना हवाबंद डब्यामध्ये मोबाईल व्हॅनद्वारे २ वेळचे जेवण, नाश्ता पुरविण्यात येणार आहे. जिल्ह्यात वन हक्क कायद्यांतर्गंत २०८५  वैयक्तीक व १९४ सामुहिक आदिवासी गटातील आदिवासींना वनहक्काचा लाभ मंजूर करण्यात आला आहे.
७७ हजार घरकुले पूर्ण-
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत केंद्र व राज्य शासनाच्या विविध आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरी झाली आहे. ज‍िल्ह्यात व‍िव‍िध योजनांमध्ये ७७ हजार ५०० घरकुलांचे बांधकामे पूर्ण झाले आहे.  प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गंत जिल्ह्यात ६० हजार घरकुले पूर्ण झाली आहेत. शबरी योजनेंतर्गत ४ हजार ६०५ घरकुले पूर्ण करण्यात आली असून रमाई आवास योजनेंतर्गंत १२ हजार ९३१ घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत.
यावल वनात १२ लाख वृक्षांची लागवड
यावल वन विभागाने १२ लाख ६५ हजार  वृक्षांची लागवड करण्यात आली असून जल व मृदसंधारणाची १९० कामे करण्यात आली आहेत. यामुळे १३ हजार ३२२ मनुष्य दिवस रोजगार निर्माण झाला आहे. उनपदेव व मनुदेवी येथे पर्यटनाच्या १० कोटींच्या कामांना मंजूरी मिळालेली असून सदर कामे तातडीने पूर्ण करण्यात येणार आहेत. अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी द‍िली.
जलजीवन मिशन जिल्ह्यात आकार घेत आहे –
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, हर घर नल से जल” हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेले जलजीवन मिशन जिल्ह्यात आकार घेत आहे. जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत एकूण २६ योजना राबविल्या जात असून त्यासाठी ५२६ कोटी ५६ लाख रूपये खर्च करण्यात येत आहेत. जळगाव जिल्हा परिषदेतर्फे १४०० योजना राबविल्या जात असून १ हजार २३९ कोटी रूपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
केळी व‍िकास महामंडळाची स्थापना होणार 
जळगांव येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  केळी विकास महामंडळाची घोषणा केली आहे. या महामंडळासाठी पहिल्या टप्प्यात ५० कोटींचा न‍िधी  उपलब्ध होणार आहे. लवकरच जळगांव येथे केळी महामंडळाची स्थापना ही होणार आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जळगांव येथे विभागीय आयुक्त कार्यालय स्थापन करणार असल्याची ही घोषणा केली असल्याने  विभागीय आयुक्तालयांची ही घोषणा अंमलात आणण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. अशी माह‍िती ही पालकमंत्र्यांनी यावेळी  द‍िली.

Leave A Reply

Your email address will not be published.