दिवाळी स्पेशल रेसिपी : ड्रायफ्रुट करंजीचे सारण

0

खाद्यसंस्कृती विशेष 

 

थंडीची हळूवार चाहूल लागते म्हणजे दिवाळी साजरी करण्यासाठी सगळे आपापल्या परीने कामाला सुरुवात करायला लागतात. कोणी घर सजवत तर कोणी घरातल्या कामात मदत करत. पण आपला महिला वर्ग दिवाळी सुरू होण्याआधी पासून ते संपेपर्यंत दिवाळी सणात काही कमी पडू नये हे पाहत असतो. त्यामध्ये दिवाळी फराळ बनवणार म्हटले तर अगदी सुगरणी सज्ज असतात. अगदी पारंपरिक पद्धतीने किंवा हल्ली युट्यूबवर पाहून फराळाच्या रेसिपी पाहिल्या जातात मग यामध्ये काहीवेळा तो पदार्थ फसतो. याच खरं कारण म्हणजे प्रमाण. आपण कोणताही पदार्थ अगदी प्रमाणात घेतला तर कोणताही पदार्थ अचूक बनतो. चला तर मग आपण अगदी प्रमाणासहित यावर्षीचा फराळ रूचकर बनवूया.

 

ड्रायफ्रुट करंजीचे सारण

 

साहित्य:

• ३/४ कप बारीक रवा

• १/२ कप खवा, भाजलेला

• १/२ टिस्पून वेलची पूड

• ५ टेस्पून पिठीसाखर किंवा चवीनुसार

• ३ टिस्पून तूप

• अर्धा ते पाऊण कप ड्राय फ्रुट्स

• २ टेस्पून चारोळी

• ७ ते ८ काजू, बारीक तुकडे

• ७ ते ८ बदाम, पातळ चकत्या

• ६ ते ७ खजूर, बिया काढून बारीक चिरून घ्यावे

• ५ ते ६ खारका, बिया काढून बारीक चिरून घ्यावे.

• १/४ कप किसलेले सुकं खोबरं, भाजून

• २ टिस्पून खसखस, हलकीशी भाजून

 

कृती:

• पॅनमध्ये २ टिस्पून तूप गरम करून त्यात चारोळी, काजूचे तुकडे, बदाम स्लाईसेस, चिरलेली खारीक घालून ५ ते ८ मिनीटे मध्यम आचेवर परतावेत.

• खजूर आधीच घालू नये. गॅसवरून पॅन बाजूला करायच्या आधी २ मिनीटे खजूर घालून परतावे. नंतर एका परातीत काढून ठेवावे.

• त्याच पॅनमध्ये १ टिस्पून तूप गरम करून त्यात रवा गुलाबीसर रंगावर भाजावा.

• भाजताना आच मंद किंवा मध्यम असावी. बारीक रवा खुप मोठ्या आचेवर भाजल्यास करपू शकतो. तसेच पटकन ब्राऊन झाला तरी तो निट भाजला गेलेला नसतो. कच्चा राहातो.

• आता भाजलेला रवा, भाजलेला खवा, भाजलेली ड्राय फ्रुट्स, भाजलेली खसखस आणि वेलचीपूड घालून निट मिक्स करावे.

• खासकरून खवा निट मिक्स करावा कारण त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. शेवटी चवीनुसार साखर घालून मिक्स करावे.

 

टीप:

• साखर नको असेल तर गोडपणासाठी साखरेऐवजी खजूराचे प्रमाण वाढवावे.

• घरातील उपलब्धतेनुसार तसेच आवडीनुसार कोणताही सुकामेवा वापरू शकतो जसे पिस्ता, अक्रोड, बेदाणे इत्यादी.

• या सारणापासून ड्रायफ्रुट करंजी किंवा ड्रायफ्रुट मोदक बनवू शकतो.

 

अपर्णा स्वप्निल कांबळे – नांगरे

पत्रकार/फुड ब्लॉगर

९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.