असा महामानव होणे नाही

0

लोकशाही, संपादकीय लेख

 

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (Dr. Bhimrao Ramji Ambedkar) यांची आज 132 व्या जन्मदिवस साजरा होत आहे. त्यांच्या जीवनात सर्वच बाजूने अंधार होता. त्या अंधाराचा मृत्यू म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म होय. दिन दलित दुबळ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं करून त्यांना आधार देण्याचा प्रयत्न नव्हे, तर घटनेने समतेचे स्वातंत्र्य मिळवून देणारा महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या महापुरुषांच्या यादी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विद्वत्तेच्या दृष्टिकोनातून वरच्या क्रमांकावर होते, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. दिन दलितांच्या उत्थानासाठी समतेच्या स्वातंत्र्यासाठी स्वतः हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या या महामानवाच्या कार्याला तोड नाही. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महापुरुष महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल यांचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक मतभेद असताना सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेमुळे सर्व महापुरुष एकत्र येऊन स्वतंत्र भारत कसा असावा याबाबत एकत्र येऊन चर्चा करीत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी मतभेद असताना सुद्धा भारतीय घटना परिषद परिषदेत ते असले पाहिजेत असा आग्रह महात्मा गांधी यांनी धरला आणि घटना परिषदेचे सदस्य म्हणून त्यांना निवडून आणले. आणि घटना परिषद मसुदा समितीचे अध्यक्षपद त्यांच्याकडे सोपवले. कारण जगातील बहुतेक सर्व देशांच्या घटनेच्या अभ्यास आंबेडकरां एवढा कोणीही केला नव्हता. त्यानंतर भारतीय घटनेची संपूर्ण जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर सोपवली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण झालेली घटना आज जगात श्रेष्ठ ठरली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्री मंडळात काँग्रेसच्या विरोधात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कायदेमंत्री म्हणून समावेश नेहरुंनी केला. त्याला डॉ. बाबासाहेब यांची विद्वत्ता आणि कायद्याचे अभ्यासक म्हणून त्यांच्या मंत्रिमंडळात समावेश होण्यामागे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी पंतप्रधान नेहरूंकडे धरलेला आग्रह कारणीभूत आहे. अन्यथा डॉ. राजेंद्र प्रसाद (Dr. Rajendra Prasad) यांची कायदेमंत्री होण्याची इच्छा होती. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आणि पंतप्रधान नेहरू यांच्यात मतभेद निर्माण झाल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा देण्यात आंबेडकरांनी कसली तमा बाळगली नाही. अलीकडच्या राजकारणात मंत्री पदाला चिकटून बसणारे राजकारणी पाहता महामानव डॉ. आंबेडकरांची तुलना करताना अलीकडची मंडळी सत्तेसाठी किती आहे, हे दिसून येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी जयंती संपूर्ण देशभरात नव्हे तर परदेशात सुद्धा उत्साहात साजरी होत आहे. अलीकडे जयंतीला सुद्धा स्वार्थी राजकारणी मंडळी हिडीस असे स्वरूप देण्याचा प्रयत्न करतात. शिका संघटित व्हा आणि समतेसाठी लढा द्या, असा संदेश देणाऱ्या बाबासाहेबांमुळे कोट्यावधी दिन दलित अशिक्षित स्वतःच्या पायावर उभे राहिले. शिक्षणाचे प्रमाण त्यांच्यात मोठ्या प्रमाणात वाढले. त्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी घटनेने आरक्षण दिले. ते आरक्षण दिले नसते तर ‘बळी तो कान पिळी’ असा प्रकार झाला असता. आता जातीनिहाय आरक्षण संदर्भात मतभेद निर्माण झाला आहे. आर्थिक दृष्ट्या मागासलेपणाच्या निकषावर आरक्षण मिळाले, पाहिजे हा विचार पुढे आला आहे. परंतु डॉ. आंबेडकरांची अस्पृश्य जातीतील लोकांचे उत्थान व्हावे यासाठी आरक्षण दिले. त्या काळात ते अत्यंत महत्त्वाचे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत असताना तेथील ग्रंथालयात उपाशी राहून 24 तास ग्रंथ वाचन करणारे एकमेव डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयातील प्रवेश द्वारा जवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ब्रांझ पुतळा बसविण्यात आला असून त्या पुतळ्याखाली ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ (Symbol of Knowledge) असे लिहून अमेरिकन शासनाने डॉ. बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा गौरव केला आहे. भारताच्या दृष्टीने ही फार गौरवाची बाब म्हणावी लागेल. भारतातील विविध जाती जमातीतील मतभेद मिटवल्याशिवाय समता निर्माण होणार नाही. यासाठी डॉ. आंबेडकरांनी फार मोठे कार्य केले. तथापि या महामानवास जातीचे लेबल लावून ते त्यांना दलित जातीतील बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला. आंबेडकरांचे विचार प्रामाणिकपणे समाजात रुजवण्याऐवजी त्याचा राजकीय वापर केला गेला. आंबेडकरवादी विचारांचा राजकीय स्वार्थासाठी वापर केल्यामुळे आंबेडकर चळवळीचे खूप नुकसान झाले आणि आंबेडकरांना जे नको होते तेच झाले. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा महामानव आता होणे नाही. या महामानवास दैनिक लोकशाहीच्या वतीने विनम्र अभिवादन…!

Leave A Reply

Your email address will not be published.