मानवतेचा रचनात्मक विचार मांडणारा महापुरूष : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

0

लोकशाही, विशेष लेख

 

मानवनिर्मित विषमतेविरुद्ध लढा देऊन विचार, लेखन आणि कृतिशीलतेतून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ठरलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा भारतीय समाज जीवन व राजकारणावर मोठा प्रभाव पडला आहे. त्यांच्या कार्यात आमुलाग्र क्रांतीची बीजे आहेत. त्यांच्या विचाराने सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रावरही फार मोठा प्रभाव पडला आहे. दलित, पीडित, शोषित समाजात त्यांनी जागृती घडविण्याचे आयुष्यभर काम केले. मूकनायक (Muknayak ), बहिष्कृत (Bahishkrut) भारत (Bharat) व जनता (Janta) या वृत्तपत्रांच्या माध्यमातून आणि अनेक प्रकारच्या ग्रंथांच्या लेखनातून त्यांनी आपल्या लेखणीने प्रत्येक भारतीयाच्या हक्कांची जाणीव करून दिली आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग भारतीय समाज व राष्ट्राच्या विकासासाठी केला. प्रत्येकात स्वाभिमानाची प्रेरणा जागृत केली. त्यांचे आणखी एक महत्त्वाचे अंग म्हणजे पत्रकारिता. वृत्तपत्रकारिता ही जनसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडून त्यांना न्याय देणारी हवी. आपल्या लेखनातून सर्वसामान्यांचे मत तयार करणे, मार्गदर्शन करणे व प्रेरणा देणे असे काम त्यांनी आयुष्यभर केले.

१४ एप्रिल १८९१ रोजी जन्म झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मामुळे हजारो वर्षाच्या अन्यायग्रस्त पिढीच्या जीवनाची काळरात्र संपली. अथक परिश्रम, अभ्यास व संघर्षाने त्यांनी मानवी जीवनाचा नवा इतिहास लिहिला. समता व मानवतेचा रचनात्मक विचार मांडला. व्यक्तीपेक्षा विचार आणि देशाला महत्त्व दिले. व्यक्ती जन्माने नव्हे तर कर्माने श्रेष्ठ ठरतो असा क्रांतिकारक विचार मांडला. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारीत नवा समाज उभा केला. त्यांनी सतत आपल्या विचाराने व कृतीतून समाजाला एकात्मता व बंधुभावाच्या आधारावर उभारण्याचा प्रयत्न केला. भारतीय समाजाच्या उत्कर्षाचा जाहीरनामा म्हणजे भारतीय संविधान हे एक वैश्विक ऐतिहासिक दस्तऐवजाच्या स्वरूपात निर्माण केले आहे.

आपल्या निर्णायक भूमिकेमुळे साऱ्या समाजाचे जगण्याची दिशा त्यांनी बदलली. त्यांचे जीवन म्हणजे एक समर्पणाचा वैभवशाली इतिहास आहे. संपूर्ण आयुष्य त्यांनी दीन, पददलित, भटके, विमुक्त जाती, स्त्रियांच्या उत्कर्षासाठी समर्पित केले. लोकशाहीवर आधारित भारताची उभारणी केली. लोकशाही ही एक जीवन जगण्याची पद्धती असल्याने राजकीय लोकशाही बरोबरच सामाजिक व आर्थिक लोकशाही जीवनाची रचना ही त्यांनी केली. अन्याय, अत्याचार या गर्तेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी जाणले. त्यामुळे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असे आवाहन त्यांनी केले.

त्यांचे वाचन अफाट होते. हजारो ग्रंथ त्यांच्याकडे होते. प्राध्यापकांनी अध्ययन, अध्यापन व संशोधन यासाठी स्वतःला वाहून घ्यावे असे त्यांचे मत होते. प्राध्यापक हा विद्वान, उत्साही, शिस्तबद्ध, सर्वश्रुत असावा. त्याने आपली वक्तृत्व कला विकसित करावी. सर्व समाजाच्या दुखण्यावर शिक्षण हे औषध आहे. शिक्षणाने सामाजिक जाणिवा निर्माण होऊन माणसाचा दर्जा वाढतो. नोकरी लागल्यानंतरही शिक्षण व अभ्यास सुरू ठेवले पाहिजे. समाजकारण व राजकारण करताना त्यांनी शैक्षणिक कार्य केले. आपल्या संपूर्ण जीवनाला समाजासाठी वाहून घेतले. खेड्यातील भूक, दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा, जातीयता, अस्पृश्यता दूर व्हावी यासाठी त्यांनी शिक्षणाला प्राधान्यक्रम दिला. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असा क्रांतिकारी विचार त्यांनी समाजात पेरला. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी असण्यासाठी शिक्षणाची गरज आहे.

प्राथमिक शिक्षण हे शिक्षणाचा पाया असल्यामुळे ते दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असले पाहिजे. याकडे शासनाने लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले. शिक्षणाअभावी माणसाची अवस्था कशी होते हे सांगताना ते म्हणतात, उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस हतबल होऊन अल्पायुषी होतो. परंतु शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो. म्हणून त्यांनी शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व दिले. लोकशिक्षणाचा आग्रह धरला. त्यांच्या शैक्षणिक विचारांनी परिवर्तनाची संघर्षशील प्रेरणा निर्माण केली. विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेला विद्यार्थी बहुश्रुत असला पाहिजे. त्यांचा भावनिक, बौद्धिक, मानसिक व शारीरिक विकास हा परिपूर्ण झाला पाहिजे. असा विद्यार्थी घडविण्यात प्राध्यापक, शिक्षक यांना अनुदान दिले पाहिजे. विद्यापीठ हे शिक्षण मंदिर झाले पाहिजे. शिक्षणासंबंधी त्यांनी अत्यंत तळमळीने विचार मांडले आहेत. व्यक्तिमत्व विकास व समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिले.

त्याचप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीक्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी मांडलेले विचार महत्त्वपूर्ण आहेत. भारतीयांचे उपजीविकेचे साधन शेती होते. परंतु ब्रिटिशांच्या चुकीच्या धोरणामुळे अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नसे. अशा वेळी शेती विषयक समस्या व उपाय यांची त्यांनी चर्चा केली. शेतीच्या विकासासाठी शेतकऱ्यांना अल्प यादी कर्ज सरकारने पुरवावे, शेतीवर आधारित लघु उद्योगांची उभारणी करावी, जमीनदारी पद्धत नष्ट करावी असे त्यांनी सांगितले. भूमिहीन शेतकऱ्यांना पडीत जमीन कसण्यासाठी द्यावी, सामूहिक शेती संकल्पना राबवावी, असे सांगितले. कायद्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्री मुक्तीसाठी कार्य केले. स्त्रियांवर लादलेली गुलामगिरी दूर करून त्यांना समानतेचा अधिकार देण्याचे काम केले.

मजूर मंत्री असताना पुरुषांबरोबर स्त्रियांना समान वेतन देऊन त्यांना बाळंतपणाची रजा देण्यात यावी, स्त्रियांना मतदानाचा अधिकार द्यावा अशी भूमिका घेतली. अशा प्रकारे शिक्षणतज्ञ, कायदेपंडित, मानसशास्त्रज्ञ, प्रशासकीय विचारवंत, मुक्तिदाते, इतिहासतज्ञ, युगप्रवर्तक, दूरदृष्टी लाभलेले, राष्ट्रभक्त, तर्कशास्त्रज्ञ, उत्कृष्ट राजकारणी, लोकनेता, ग्रंथकार, प्रज्ञासूर्य, पत्रकार, घटनेचे शिल्पकार अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज दि १४ एप्रिल जन्मदिन (April 14 birthday). त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन…!

डॉ. जगदीश पाटील
भुसावळ
८१४९४९८०२०

Leave A Reply

Your email address will not be published.