प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अत्याचार करणाऱ्या डॉक्टरला पोलिसांनी केले अटक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सोशल मीडियावर तरुणींची ओळख करून त्यानंतर त्यांचं लैंगिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या नराधम डॉक्टरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. योगेश भानुशाली असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीस मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात आतापर्यंत ३ तरुणींवर बलात्कार आणि त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. नालासोपारा येथील तुळींज पोलिसांनी हे प्रकरण सर्वप्रथम उघडकीस आणले होते.

नालासोपारा येथे वास्तव्यास असलेल्या २१ वर्षीय तरुणीची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून डॉ. योगेश भानूशाली (३१) याच्याशी ओळख झाली. या ओळखीचे मैत्रीत रुपांतर झाले. त्याने तिच्याशी प्रेमसंबंध ठेवले. यानंतर वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध ठेऊन तिच्याकडून पैसे उकळू लागला. मात्र तरुणीने लग्नाची विचारांनी केली असता तिला त्याने नकार दिला.

या सर्व घडलेल्या प्रकारामुळे तरुणी डिप्रेशनमध्ये गेली होती. अखेर तिच्या आईने नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दिली होती. मात्र ती तरुणी तक्रार देण्यास तयार नव्हती. तिने हातावर देखील आरोपीच्या नावाचं टॅटू काढलं होतं. अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर पाटील यांनी मुलीचे समुपदेशन करून तिला तक्रार देण्यास मन वळवले.

पोलिसांवर विश्वास बसल्यानंतर तरुणीने तक्रार दाखल केली. तिच्यावर मालाडमधील योगेश भानुशालीच्या घरी अत्याचार झाल्याने गुन्हा मालवणी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. या प्रकरणात आणखी ६ ते ७ तरुणी पीडित असल्याची शक्यता पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी व्यक्त केली आहे. आरोपी भानुशाली याच्याविरोधात २०२० मध्ये देखील अत्याचार आणि पोक्सोअंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.