जिल्ह्याच्या प्रगतीसाठी जिल्हावासीयांना जिल्हाधिकाऱ्यांची हाक

0

 

लोकशाही स्पेशल स्टोरी

 

प्रशासनाच्या चाकोरीबद्ध कार्यक्रमाव्यतिरिक्त जिल्ह्यातील सकारात्मक ऊर्जेला चालना देणारा निराळा अधिकारी

प्रशासकीय कामाव्यतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या प्रगतीसाठी मांडले विचार.

नाशिक औरंगाबाद हे जिल्ह्याचे जळगाव जिल्ह्याच्या पुढे गेले कसे?

आंतरराष्ट्रीय जैन उद्योग समूहाचे मुख्यालय जळगाव शहर ही अभिमानाची बाब.

जिल्ह्यातील उद्योगधंद्यांची वाढ न होण्याची कारणे काय?

सकारात्मक विचार वाढीस लागून आपला विकास साधा.

इतरांना दोष देत बोटे मोडत बसण्यापेक्षा आपल्यातील सकारात्मक ऊर्जेचा वापर करा

जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेते सकारात्मक विचारांचे, त्यांच्यात सहकार्याची भावना

 

जळगाव

सन १९७० च्या सुमारास जळगाव, नाशिक आणि औरंगाबाद हे तिन्ही जिल्हे सर्वच दृष्टीने एकसारखे होते. परंतु ५० वर्षाच्या कालावधीत नाशिक आणि औरंगाबादची लक्षवेधी प्रगती झाली. या दोन्ही जिल्ह्यात उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे रोजगार वाढला, व्यापार वाढला, दोन्ही शहराचे अर्थचक्र वाढले. सर्वच दृष्टीने औरंगाबाद आणि नाशिक ही दोन्ही जळगाव पेक्षा कितीतरी पटीने विकसित झाली. जळगाव हे मागे का राहिले? जळगाव शहर आणि जिल्ह्यात ती क्षमता असताना ते मागे का राहिले? याला जबाबदार कोण?

योग्य राजकीय नेतृत्वाचा अभाव याला कारणीभूत असल्याचा ठपका ठेवून आपण मोकळे होतो. नाशिक, पुणे, मुंबईमध्ये आव्हाने नाहीत का? शिक्षणासाठी, नोकरीसाठी अथवा उद्योग टाकण्यासाठी नाशिक, पुणे, मुंबई या शहरांऐवजी जळगाव का नको? याबाबत जळगाव शहर आणि जिल्ह्यातील जनतेने सकारात्मक विचार व तितक्यात सकारात्मक ऊर्जेचा वापर केला, तर येत्या १०-१५ वर्षात जळगाव जिल्हा विकासात फार मोठी भरारी घेऊ शकतो, असा विश्वास नुकतेच रुजू झालेले जळगावचे नवे तरुण, तडफदार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला आहे. तसेच जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सोशल मीडियावर जिल्हावासियांना तीन प्रश्न विचारून त्याबाबत उत्तरे शोधण्याचा अभिनव प्रयत्न देखील केला आहे.

जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी पद होय. शासनाच्या चाकोरीबद्ध चौकटीत राहून प्रशासनाचा गाडा योग्य रीतीने सांभाळण्याची जबाबदारी. तीन वर्षाचा कार्यकाल संपला की बदली ठरलेली. तेव्हा तीन वर्षाचा कालावधी यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न प्रत्येक अधिकारी करीत असतात. परंतु तरुण, तडफदार, उर्जेने ओतप्रोत भरलेले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे रसायनच वेगळे आहे. आपल्या कार्यकाळात काहीतरी चांगले कार्य आपल्या हातून व्हावे, जेणेकरून आपले नाव घेतले जाईल, अशा विचारांचा ध्यास बाळगणारा हा अधिकारी आहे, असे त्यांच्याशी चर्चा करताना वारंवार जाणवते.

जळगाव जिल्ह्यात रुजू झाल्यावर त्यांनी जिल्ह्याच्या अभ्यास केला. तेव्हा जिल्ह्याची क्षमता फार चांगली असून जिल्हा वासियांना सकारात्मक विचार करणारे आहेत, जिल्हा केळी उत्पादनात अग्रेसर आहे, केळीची निर्यात वाढली पाहिजे, प्लास्टिक उद्योगात वाढ होऊन त्याचाही त्याचीही निर्यात म्हणजे व्यापार वाढला पाहिजे, जळगाव शहर सोन्याचे मोठे केंद्र बनू शकतो, कापूस मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने जिनिंग मिलचे जाळे वाढणे आणि टेक्स्टाईल पार्क सारखे मंजूर प्रकल्प उभे राहिले पाहिजे, लघु उद्योगाची संख्या वाढली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

उद्योग सुरू करण्यासाठी नाशिक पुणे औरंगाबादला जाण्याची आवश्यकता नाही. जिल्ह्यात शासनाकडून इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध होत नाही, ही एक ओरड असते. त्यासाठी नाशिक, पुणे, औरंगाबाद, मुंबई ही शहरे पोषक आहेत, असा गोड गैरसमज देखील करून घेतला जातो. तो त्यांचा समज चुकीचा आहे, हे पटवून देताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जळगावच्या जैन उद्योग समूहाचे उदाहरण देतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरची जैन उद्योग कंपनी असताना त्याचे मुख्यालय जळगाव आहे, ही स्वाभिमानाची बाब असून त्यासाठी नाशिक, पुणे, मुंबई ही शहरे हवीतच कशाला? एवढे उदाहरण पुरेसे आहे. त्यामुळे शासकीय सोयी सुविधांच्या उपलब्धता होणे आवश्यक आहे. परंतु आपण आता स्वतःमध्ये बदल करून स्वतःतील सकारात्मक ऊर्जेला चालना दिल्यास जळगाव हे उद्योगधंदाच्या वाढीसाठी योग्य शहर आहे, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणतात त्यात तथ्य आहे.

जळगाव जिल्ह्यात महामार्ग रस्ते कनेक्टिव्हिटी चांगली आहे. रेल्वे वाहतुकीची चांगली सोय आहे. २४ तास पाणी आणि वीज उपलब्ध होऊ शकते. अशा प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर असताना आजपर्यंत जिल्ह्यातील उद्योगधंदे का वाढू शकले नाहीत? या प्रश्नाचे उत्तर आता जळगाव वासियांनाच शोधून काढायचे असून असलेले चांगले उद्योगधंदे बंद का पडले? याचा विचार करून रडत बसण्यापेक्षा नवे उद्योगधंदे सुरू करण्यास आता विचार झाला पाहिजे.

राजकीय नेतृत्वाच्या दृष्टीने विचार केला, तर सर्वच राजकीय नेते सकारात्मक विचार करणारे आहेत. नकारात्मक विचार करणारे नेते नाहीत. फक्त या राजकीय नेत्यांशी संपर्क साधून त्याचे कडून त्यांच्याकडून आपला फायदा करून घेणे आवश्यक आहे. प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते यांचे नाते मी स्वतः नवरा बायकोचे नाते असल्यासारखी मानतो, असे सांगून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणतात, “नवऱ्याने म्हणजे नेत्याने पैसे आणायचे आणि ते पैसे बायकोने म्हणजे अधिकाऱ्यांचे काटकसरीने योग्यरित्या खर्च करायचे. त्याचे मी तंतोतंत पालन करणारा अधिकारी आहे, असे स्पष्ट ते सांगतात. त्याचबरोबर जिल्ह्यातील कुणासाठीही मी २४ तास उपलब्ध आहे. आपली योग्य मागणी घेऊन आपण माझ्याकडे केव्हाही आलात तर तुमच्या मागणीचा विचार केला जाईल. योग्य असेल तर ती तातडीने सोडवली जाईल.

जळगाव जिल्ह्याच्या प्रगतीसाठी जळगाव जिल्हा वासियांना जिल्हाधिकाऱ्यांनी सोशल मीडियाच्या संकेतस्थळावर तीन प्रश्न विचारले आहेत. त्या प्रश्नांना योग्य असा प्रतिसाद जळगाव जिल्हा वासियांनी दिला, तर जिल्ह्याच्या प्रगतीसाठी येणारे अडसर दूर होतील यात शंका नाही. जिल्ह्याचा विकास एक-दोन वर्षात होणार नाही, त्यासाठी दहा-पंधरा वर्षाचा संघर्ष करावा लागेल, याची सुद्धा कल्पना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यासाठी एक दालन जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केले आहे. त्याचा फायदा जिल्हा वासियांनी घ्यावा. त्यासाठी सतत विचार विनिमय झाला पाहिजे. चर्चा सत्राचे आयोजन व्हावे, तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित केले जावे, जनतेमध्ये सकारात्मकता वाढीस लागण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, अन्यथा देशात केळी पिकवणारा जिल्हा म्हणून जळगावची ओळख असताना गुजरात राज्य आणि सोलापूर जिल्हा केळी उत्पादनात आणि निर्यातीत पुढे का गेला? याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

प्रतिक्रिया पाठवा

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची जिल्ह्याच्या प्रगती संदर्भात जिल्हावासीयांना दिलेल्या हाकेला प्रतिसाद मिळावा, हीच या मागची अपेक्षा आहे. त्याबाबत वेळोवेळी ऊहापोह करण्याचा दैनिक लोकशाहीचा मानस आहे. याबाबत वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया पाठवाव्यात ही विनंती. त्या प्रतिक्रियांना योग्य प्रसिद्धी देण्यात येईल.

 

 

– धों. ज. गुरव 

सल्लागार संपादक, दै. लोकशाही  

Leave A Reply

Your email address will not be published.