दीक्षाभूमी विकासाच्या सुधारित आराखड्याला मान्यता कधी ? फडणवीसांनी सांगितले…

0

 

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

पुढील 15 दिवसात 190 कोटींच्या दीक्षाभूमी विकासाच्या सुधारित आराखड्याला मान्यता देण्यात येईल. अशी महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन सोहळ्यात केली. ऐतिहासिक दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या विद्यमाने तसेच जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कमला रा. गवई होत्या.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. उपस्थिती होते.

ऐतिहासिक दीक्षाभूमीवर 66 वर्षांपूर्वी 14 ऑक्टोबर 1956 रोजी अशोक विजया दशमीदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह धम्मदीक्षा घेतली होती. तेव्हापासून दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन सोहळा दीक्षाभूमी नागपूर येथे होतो.

केंद्र सरकारकडून दीक्षाभूमीला ‘अ’ दर्जाच्या धार्मिक स्थळाची मान्यता प्रलंबित आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व रामदास आठवले यांच्यासह आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे फडणविसांनी सांगितले. दीक्षाभूमीच्या विकासासाठी यापूर्वी शंभर कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला होता. त्यापैकी 40 कोटी रुपये नागपूर सुधार प्रन्यासकडे जमा आहेत. 60 कोटी रुपये देण्याची राज्य शासनाची तयारी होती. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये पाठपुराव्या अभावी दीक्षाभूमी आराखडा रखडला होता.

दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर देश-विदेशातून लाखो अनुयायी येतात. यावर्षी गेल्या तीन दिवसात जवळपास 30 लाख नागरिकांनी याठिकाणी अभिवादन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.