गुलाबराव वाघ विधानसभेसाठी तयारीला लागा- संजय सावंत

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिवसेनेचे आमदार, मंत्री हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले असताना मात्र, धरणगावात श्रीजी जिनींग येथे शिवसेनेचा तात्काळ तालुका मेळावा घेण्यात आला. जिल्ह्यातील चार आमदारांचा समावेश हा एकनाथ शिंदे गटात यापूर्वीच झाला आहे. त्यामुळे त्या चार आमदारांची भूमिका स्पष्ट आहे.

जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये एक प्रकारे संभ्रम निर्माण आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेळाव्याचे आयोजन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार धरणगावात आयोजित मेळाव्यात शिवसैनिकांची तर उपस्थिती होती मात्र, काही शिवसैनिक मेळाव्याला उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल संशयाचे वातावरण हे मेळाव्यात झाले आहे. जिल्ह्यातील चार आमदारांनी बंडखोरी करुन शिंदे गटात समावेश केला आहे. याचा कोणताही परिणाम पक्षावर होऊ नये म्हणून आता मेळावे पार पडत आहेत. त्याच अनुशंगाने शहरातील एका जीनिंग मध्ये शिवसैनिकांचा मेळावा घेण्यात आला होता. यामध्ये तालुकाभरातील शिवसैनिक सहभागी झाले होते.

यावेळी माजी नगराध्यक्ष तथा, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश चौधरी यांनी सांगितले की, एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झालेल्या बंडखोर आमदारांमुळे पक्षावर कोणताच परिणाम होणार नाही, उलट आम्ही अधिक ताकदीने लढू. आम्ही ३५ वर्षापासुन शिवसेनेसोबत आहोत, आणि राहणार.. इकडून तिकडे नी, तिकडून इकडे उड्या मारणाऱ्यांसोबत आम्ही कदापी राहणार नाहीत. आम्ही बंडखोरांसमोर लढण्याचा निर्धार केला आहे. असेही चौधरी म्हणाले. तद्नंतर उत्तर महाराष्ट्र सहसंपर्क प्रमूख गुलाबराव वाघ यांनी शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या भूमिकेचा परिणाम हा ना पक्षावर होणार आहे ना स्थानिक पातळीवरील शिवसैनिकावर. उलट अजून जास्त ताकदीने शिवसैनिक हा मैदानात उतरणार असून, महाराष्ट्रतील शिवसैनिक कालही उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते. आजही आहेत आणि उद्याही राहतील अशी ग्वाही वाघ यांनी दिली.

शिवाय ज्यांनी पक्ष प्रमुखाला धोका दिला ते खरे शिवसैनिकच नव्हते. आता नव्या आशा घेऊन शिवसैनिक हा पक्ष वाढीसाठी प्रयत्न करेल. शिवसेना व संघटनेसाठी परत याल तर निश्चितच स्वागत असेल, नाहीतर शिवसेनेच्या विरोधात गेले तर आमचे वैर असणार आहे. असेही वाघ यांनी मेळाव्याला संबोधित केले. त्यानंतर संपर्क प्रमूख संजय सावंत यांनी मेळावाप्रसंगी संभ्रम असलेल्या शिवसैनिकांना भूमिका स्पष्ट करीत म्हणाले की, शिवसेना पक्षाला कोणीही संपवू शकत नाही, आजही बाळासाहेबांची शिवसेनेवर शिवसैनिकांची निष्ठा आहे. शिवसेना हा खऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. गद्दारांना पक्षात स्थान नाही. पुढे म्हणाले की, गुलाबराव पाटलांना शिवसैनिकांनी डोक्यावर घेतले, खूप मोठ्ठे केले आणि तेच गुलाबराव आता शिवसैनिकांची डोके कापण्यास निघाले आहेत.

शिवसैनिकांनो, डगमगू नका, एक गुलाबराव गेला म्हणून काय झाले, तुम्ही अर्ध्या रात्री फक्त हाक द्या, दुसरा गुलाबराव पक्षासाठी व तुमच्यासाठी निरंतर तत्पर आहे. असेही सावंत यांनी सांगितले. या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक ॲड. शरद माळी, तालुकाप्रमुख गजानन पाटील, जळगांव महानगरप्रमुख शरद तायडे, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, नगराध्यक्ष निलेश चौधरी, गटनेते विनय भावे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, जेष्ठ नेत्या जनाआक्का पाटील, माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, सरीता माळी, कल्पना कापडणे, रत्ना धनगर, रेखा चौधरी, भारती चौधरी, माजी सभापती दिपक सोनवणे, विकासो चेअरमन उमेश महाजन, उद्योजक जिवनसिंह बयस यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण अग्निहोत्री यांनी केले तर आभार विनोद रोकडे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.