धानोरा परिसरात बत्तीगुलचे प्रमाण वाढले!

शेतकरी हैराण, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

0

धानोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार सुरु असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या संदर्भात शेतकरी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात फेऱ्या मारत असतांना त्यांना उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येत आहे. या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांनाच आंदोलन करण्याची वेळ येत आहे.

येथे वीज वितरण कंपनीचे सबस्टेशन असून परिसरातील 16 गावांचा वीज पुरवठा करण्याची जबाबदारी आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर बागायती शेती करण्यात येते. सध्या शेतकरी गहू, हरभरा, केळी यासह अन्य पिकांना पाणी देत असून वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभाराचा त्यांना फटका बसत आहे. 24 तासातून शेतीला केवळ 8 तास वीज पुरवठा होत असून ही त्यात सातत्य नसल्याने शेतकरी हैराण झाले आहे. ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांना दिवसा व सलग वीज देण्याची ग्वाही देतात, मात्र त्याला येथे हरताळ फासला गेला आहे. सध्या शेतकरी अस्मानी, सुलतानी संकटाचा सामना करीत असून त्यात वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे त्यांच्या तोंडी आलेला घास हिरावला जात आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
धानोरा हे बाजारपेठेचे गाव असून येथे वीज वितरण कंपनीचे सबस्टेशन आहे. या स्टेशनवरुन परिसरात वीज पुरवठा केला जातो. मात्र कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असतांनाही लोकप्रतिनिधी मात्र दुर्लक्ष करीत आहे. सारेच पक्ष सत्तेत सहभागी असल्याने आवाज उठवणार कोण? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

दीपक साळुंखे, शेतकरी
शेतीसाठी कंपनीकडून 8 तास वीज पुरवठा केला जात असतो, मात्र अनेक वेळा त्यात वीज बंद असल्यामुळे पिकांना पाणी देणे शक्य होते नाही. कंपनीच्या या कारभारामुळे तोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. शेतीला सलग वीज पुरवठा व्हावा ही अपेक्षा आहे.

अशोक कुलकर्णी
धानोरा सबस्टेशनला चोपड्याहून वीज पुरवठा होत असल्याने त्यात घसारा होण्याचे प्रमाण आहे. प्रत्येक फिडरवर ओव्हरलोड असल्याने वारंवार जम तुटणे, तारा तुटणे हे प्रकार होत असल्याने वीज पुरवठा खंडीत होतो. लवकरच प्रत्येक फिडलाला भेट देणार असून त्याचे सर्वेक्षण करुन वरिष्ठस्तरावर प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. सुलभ पुरवठा करण्यासाठी प्रयत्न आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.