लोकशाही न्यूज नेटवर्क
प्रवीण चव्हाण (Pravin Chavan Case) पेनड्राईव्ह प्रकरणातील मोठं अपडेट समोर आलं आहे.राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारी वकील प्रवीण चव्हाण पेनड्राईव्ह प्रकरणसमोर आणून मोठी खळबळ उडवून दिली आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळ उठवली जात आहे.
या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला असून, तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश गृहखात्याने दिले आहेत.प्रवीण चव्हाण हे विशेष सरकारी वकील असून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याबाबतचा व्हिडीओ असलेला एक
पेनड्राईव्ह देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला होता. या व्हिडीओमध्ये भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा नोंद करताना राज्य सरकारने कटकारस्थाने कशा प्रकारे रचली आहेत, याचा पर्दाफाश करण्यात आल्याचा दावा फडणवीस यांनी केला होता. दरम्यान, प्रवीण चव्हाण प्रकरणाचा तपास राज्य सरकारने सीआयडीकडे देण्याचे आदेश दिले होते; परंतु हे प्रकरण सीबीआयकडे न दिल्याने भाजप आमदार आक्रमक होत त्यांनी सभात्याग केला होता.
विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय म्हणजे विरोधकांची कत्तल कशी करायची, याबाबतची कटकारस्थाने रचण्याचे मुख्य ठिकाण आहे. येथेच गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचण्यात आला. महाजनांविरोधात गुन्हा कसा नोंद करायचा, ‘एफआयआर’ नोंद करणे आणि खोटे साक्षीदार तयार करण्याचे काम या कार्यालयातच प्रवीण चव्हाण यांनी केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता.
साक्षी कशा घ्यायच्या, त्यापासून पैसे कसे घ्यायचे, याचा सर्व घटनाक्रम या व्हिडीओमध्ये असल्याचा दावा फडणवीस यांनी केला हाेता.दरम्यान, प्रवीण चव्हाण यांनी राजीनामा दिला असून, आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे.