डेंग्यूने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; यंत्रणा अलर्ट

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव जिल्ह्यामध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असून आता चाळीसगाव शहरात नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा डेंग्यूची लागण होऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

चाळीसगाव शहरातील नारायणवाडी परिसरात राहणारा यश विवेक काळे (वय १४) याला मागील चार- पाच दिवसांपासून ताप आला होता. त्याला उपचारासाठी डॉक्टरांकडे दाखवल्यानंतरही ताप पूर्णतः उतरला नव्हता. शनिवारी (ता. ३०) पुन्हा ताप आल्याने दुसऱ्या डॉक्टरांकडे दाखवले. डॉक्टरांनी गोळ्या, औषधी दिल्यानंतर रविवारी (ता. १) पुन्हा त्याची तब्येत बिघडली व अचानक चक्कर आले. कुटुंबीयांनी त्याला तत्काळ शहरातील डॉ. वाघ यांच्या दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला तपासून नाशिक येथे नेण्यास सांगितले.

यशला नाशिक येथील खासगी रुग्णालयात यशला दाखल केले असता त्याच्यावर उपचार सुरु असताना सोमवारी (२ ऑक्टोबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याच्या रक्ताचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर यशला डेंग्यूची लागण झाल्याचे डॉ. वाघ यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीती पसरली असून पालिकेने आणखीन दुसरा बळी जाण्याची वाट न पाहता, या भागात तत्काळ स्वच्छता करुन डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.