“दीप” लावू जगी

0

लोकाध्यत्मा विशेष लेख 

“तमसोमा ज्योतिर्गमय ” ही आपल्या भारतीय संस्कृतीची खरी ओळख आहे. अंधकाराचा नाश करून प्रकाशाची नवीन प्रेरणादायी सुरुवात करण्यासाठी आपली ओळख देणाऱ्या दीप म्हणजे दिव्याची. आपल्या परंपरेने जपवणूक अग्रक्रमाने वरचे स्थान देऊन केली आहे. तुळशीसमोरील पणती. देवघरातील दिवा, समई किंवा नवरात्रातील सतत तेवणारा नंदादीप, औक्षण करण्यासाठी लावण्यात येणार दीप. ही काही उदाहरणे म्हणजे आपले जीवन प्रकाशमान व्हावे यासाठी आपण न विसरता दीप प्रज्वलित करावा हाच उद्देश आहे. आषाढ महिन्यातील शेवटची अमावस्या म्हणजे दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते.

या दिवशी दिवा, समई, नंदादीप, लामणदिवा, कंदील, निरांजने यांचे पूजन केले जाते. अतिशय उद्दात्त व व्यापक भूमिका या मागे आहे ती ही कि आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन ते प्रकाशमान व्हावे त्याहीपेक्षा महत्वाचे हे की आपल्या अंतरीचा दीप आपण प्रजवलीत करावा जेणेकरून आपले अंतर्मन प्रकाशमान होईल व मनावर चढलेले मळभ, बुद्धीवरची पुटं दूर होतील म्हणूनच म्हटले आहे.

 “शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते” 

मानवातील शत्रुबुद्धीचा जरी नाश झाला तरी बरेचसे प्रश्न सुटतील व मानवाचा जीवनप्रवास सुखकर होईल. याचे ज्ञान अध्यात्मिक मार्गाने प्रबोधन होऊन व्हावे म्हणून संतांनी कीर्तन परंपरा जोपसली. संत नामदेव महाराज म्हणतात..

“नाचू कीर्तनाचे रंगी। 

ज्ञानदीप लावू जगी॥”

सर्वच कार्यक्रमांची सुरूवात दीप प्रजवलाने करणे हिची आपली संस्कृती आहे. ते यासाठीच की आपण अंतर्मनाने प्रकाशमान व्हावे व आपला जीवन प्रवाह निर्मळ व्हावा. मनाची निर्मळता प्राप्त करण्यासाठी या दीप अमावस्येचे दीप पूजन प्रेरणादायी ठरावे अशी अपेक्षा करण्यास हरकत नसावी..

॥जय जय रामकृष्ण हरी॥   

प्रा. नितीन मटकरी

९३२६७७८३२९

Leave A Reply

Your email address will not be published.