१४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
पुणे – विद्युत पुरवठा सुरू असलेल्या आणि जमिनीपासून धोकादायक अंतरापर्यंक खाली आलेल्या वीजवाहिनीचा धक्का लागून १४ वर्षे वयाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर बलकवडेनगर परिसरात घडली. या घटनेबाबत गेल्या काही दिवसांपासून चौकशी करण्यात येत होती. अखेर या मुलाच्या मृत्यूसाठी महावितरणच्या अभियंत्याचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता संबंधित अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश पुजारी (वय १४) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. मंजुनाथ होन्नया पुजारी (वय ५७,रा. कर्वेनगर, पुणे) यांनी पोलीसांकडे याबाबत फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-कोंढवा रस्त्यावर बलकवडेनगर परिसरात महावितरणच्या वीज खांबावरील वीजवाहिनी जमिनीपासून सुमारे चार फूट अंतरापर्यंत खाली आली होती. ही वीजवाहिनी धोकादायक अवस्थेत असल्याची माहिती महावितरणच्या कात्रज विभागाचे अभियंता शिवलींग शरणप्पा बोरे यांना होती. मात्र, त्यांनी त्याबाबत सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना न करता निष्काळजीपणा दाखविला असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
मंजुनाथ पुजारी यांचा मुलगा ऋषिकेश काही दिवसांपूर्वी याच परिसरातून जात होता. त्या वेळी त्याला याच वाहिनीचा जोरदार धक्का बसला. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला याबाबत भारती विद्यापीठ पोलिसांनी आकस्मित मृत्यू अशी नोंद केली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी आणि तपास करण्यात आला. त्यात अभियंता बोरे दोषी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.