तुझी मस्ती उतरवेन! अजित पवारांच्या आमदाराची शिवीगाळ

व्हिडीओ आला समोर : सुप्रिया सुळे संतापल्या

0

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क

बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार संघर्ष तापलेला असताना इंदापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराने विरोधी पक्षातील कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांचा व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. भरणे शिवीगाळ करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘केवळ दडपशाहीपुढे न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असे वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत ही चिडचिड खूप काही सांगून जाते,’ असे रोहित पवारांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दडपशाहीला भीक घालणार नाही, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.

दत्ता भरणेंचा व्हिडीओ धक्कादायक असल्याचं बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. मी त्या घटनेची माहिती घेत आहे. कार्यकर्त्यांनी मला तो व्हिडीओ दाखवला. हा प्रकार कुठे घडला, कसा घडला, याचा तपशील मी घेत आहे, अशी माहिती सुळेंनी दिली. त्यांनी याबद्दल कार्यकर्त्यांना विचारणा केली. त्यावर आपला नाना गवळी असल्याचे उत्तर कार्यकर्त्यांनी दिले. त्या व्हिडीओत नाना दिसत नाहीत. केवळ भरणेच शिवीगाळ करताना दिसतात. पण आम्ही नानांचा आवाज ओळखला. भरणे नाना यांनाच शिवीगाळ करत होते, असे कार्यकर्त्यांनी सुळेंना सांगितले.

प्रकार धक्कादायक

नाना यांना तुम्ही फोन केला का, अशी विचारणा सुळेंनी कार्यकर्त्यांकडे केली. तुम्ही बूथ सांभाळा. मी तिकडे जाऊन येते, असे सुळेंनी कार्यकर्त्यांना सांगितले. रोहित पवारांनी व्हिडीओ ट्विट केल्याची माहिती कार्यकर्त्यांनी सुळेंना दिली. कार्यकर्त्यांनी सुळेंना व्हिडीओ देखील दाखवला. मी रोहित पवारांशी बोलते. घडलेला प्रकार धक्कादायक आहे, असे सुळे म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.