मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. विमा कंपन्यांनी पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवलेत. पीक विमा कंपन्यांनी पीक विमा अग्रीम रक्कम वितरित केली आहे. कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात ३५ लाख ८ हजार शेतकऱ्यांना १ हजार ७०० कोटी रुपये ७३ लाख रुपये वितरण करण्यास मंजुरी दिली.
दरम्यान दिवाळीत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची २५ टक्के पीकविमा अग्रीम रक्कम मिळेल. असा शब्द राज्याचे कृषिमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी दिला होता. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अग्रीम पीकविम्याची रक्कम १ हजार रुपयांपेक्षा कमी आहे, त्या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे किमान १ हजार रुपये याप्रमाणे रक्कम मिळावी, असा नियम आहे. त्यामुळे उर्वरित १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना ३५ कोटी रुपयांचे वाटपही लवकरच होणार आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची विमा अग्रिम रक्कम मंजूर करावी, अशा सूचना दिल्या होत्या. कंपनीने शासनाकडे महाडीबीटीमार्फत वितरणासाठी विमा अग्रिमची २४१ कोटी रुपयांची रक्कम शासनाकडे जमा केली होती. मात्र दिवाळीमुळे बँकांना सुट्या असल्याने मागील तीन दिवस ही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नव्हती.