१७ पोलिसांसह ८ कर्मचाऱ्यांवर वाहतूक शाखेची कारवाई

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

चंद्रपूर :१७ पोलिसांसह ८ कर्मचाऱ्यांवर वाहतूक शाखेची कारवाई. दुचाकी वाहनचालकांच्या अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जिल्ह्यात हेल्मेट सक्ती केली आहे. पहिल्या टप्प्यात विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या पोलिसांवरच कारवाईचा बडगा उचलण्यात आला. दरम्यान, १७ पोलीस कर्मचारी तर ८ इतर कर्मचाऱ्यांवर ५०० रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढत आहे. अपघातात मृत्युमुखी पडण्याऱ्या अनेक दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान न केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अपघाताला आळा घालण्यासाठी वाहतूक निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी हेल्मेट सक्ती केली आहे. पहिल्या टप्प्यात पोलीस कर्मचारी रडारवर आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात शासकीय कर्मचारी त्यानंतर सर्वसाधारण नागरिक, अशी कारवाई करण्यात येणार आहे.

त्यानुसार १७ पोलिसांसह इतर विभागाच्या आठ कर्मचाऱ्यांवर ५०० रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच, दुसऱ्यांदा हे पोलीस किंवा इतर कर्मचारी विनाहेल्मेट आढळून आल्यास दीड हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

दरम्यान, विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या सर्वांवरच कारवाई करण्यात येणार आहे. पहिली सुरुवात पोलिसांपासून करण्यात आली आहे. त्यामुळे दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करूनच वाहन चालवावे, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोर जावे लागेल, अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.