विश्वचषकापूर्वीच या स्टार खेळाडूची निवृत्ती…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

एकदिवसीय विश्वचषक 2023 भारतीय भूमीवर 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. पहिला सामना मागच्या वेळच्या अंतिम सामन्यातील प्रतिद्वंदी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. 2019 चा एकदिवसीय विश्वचषक इंग्लंडने जिंकला होता. आता विश्वचषकापूर्वीच इंग्लंडचा स्टार खेळाडू अॅलेक्स हेल्सने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

अॅलेक्स हेल्सने वयाच्या ३४ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकात तो इंग्लंडकडून अखेरचा पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. आपल्या देशासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणे हा बहुमान असल्याचे हेल्सने सांगितले. मी आयुष्यभरासाठी काही आठवणी बनवल्या आहेत आणि मला वाटते की आता पुढे जाण्याची योग्य वेळ आहे. इंग्लंडच्या शर्टमध्ये खेळताना मी चढ-उतार पाहिले आहेत. हा एक चांगला प्रवास आहे आणि मला आनंद आहे की इंग्लंडसाठी माझा शेवटचा सामना विश्वचषक फायनल जिंकण्याचा होता. तो पुढे म्हणाला की तो फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहणार आहे.

पाकिस्तान सुपर लीग 2023 मध्ये खेळण्यासाठी अॅलेक्स हेल्सला या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडच्या T20 संघातून वगळण्यात आले होते आणि त्यानंतर त्याला बांगलादेशविरुद्ध T20 मालिकेत देखील सामील केले नव्हते. आता हेल्सची निवृत्ती चाहत्यांसाठी मोठा धक्कादायक ठरली आहे कारण तो २०२४ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडकडून खेळण्याचा प्रबळ दावेदार होता. हेल्सच्या निवृत्तीमुळे टी-२० संघात विल जॅक्स आणि फिल सॉल्टसारख्या खेळाडूंना संधी मिळेल.

अॅलेक्स हेल्स इंग्लंडकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला. त्याने 2011 साली इंग्लंडकडून टी-20 सामन्यांत पदार्पण केले. त्याने इंग्लंडकडून 11 कसोटीत 573 धावा, 70 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2419 धावा आणि 75 टी-20 सामन्यात 2074 धावा केल्या. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये 7 शतके झळकावली.

Leave A Reply

Your email address will not be published.