सावधान.. लहान मुलांना खोकल्याची औषधं देताय ?

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

तुम्ही लहान मुलांना खोकल्याची औषधे (cough syrup) देत असाल तर हि बातमी नक्की वाचा. काही दिवसांपूर्वी उझबेकिस्तानमध्ये कफ सिरपचे सेवन केल्यामुळे तब्बल १९ लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी मारयॉन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड (Marion Biotech Private limited) या मूळच्या भारतीय कंपनीने तयार केलेल्या कफ सिरपच्या सेवनामुळे ही घटना घडली, असा आरोप करण्यात आला होता. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) या कंपनीचे दोन कफ सिरप लहान मुलांना देऊ नये, असे आवाहन केले आहे.

मारयॉन बायोटेक कंपनी मूळची उत्तर प्रदेशची आहे. ही कंपनी Ambronol आणि DOK-1 Max या दोन कफ सिरपचे उत्पादन घेते. याच दोन फक सिरपची चाचणी केल्यानंतर यामध्ये डायइथिलीन ग्लायकोल तसेच इथिलीन ग्लायकोल हे घटक योग्य प्रमाणात नसल्याचे समोर आले आहे. याच कारणामुळे जागतिक आरोग्य संघटनेने लहान मुलांना मारयॉन बायोटेक या कंपनीचे वरील दोन कफ सिरप देऊ नये, असे आवाहन केले आहे.

नेमकं प्रकरण काय ?

मारियॉन बायोटेक या कंपनीने निर्माण केलेल्या कफ सायरपच्या सेवनामुळे उझबेकिस्तानमध्ये १९ मुलांचा मृत्यू झाला होता. श्वसनाचा विकार जडल्यामुळे या मुलांचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांच्या पालकांकडून डॉक-१ मॅक्स सायरप (Dok-1 Max Syrup) देण्यात आले होते. मुलांना २ ते ७ दिवस हे औषध दिवसातून ३ ते ४ वेळा देण्यात आले होते. प्रमाणापेक्षा जास्त औषध दिल्यामुळे मुलांचा मृत्यू झाला होता. या घटनेची दखल उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने घेतली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.