पांढऱ्या सोन्याला अच्छे दिन ! प्रथमच 12 हजारांचा टप्पा ओलांडला

0

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या भावात चढउतार पाहायला मिळत होते. यंदा प्रथमच अकोटमध्ये पांढऱ्या सोन्याला अच्छे दिन आले असून बारा हजार रुपये दर मिळाला आहे.

कापसाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या अकोट बाजार समितीत कापूस (जाड) हा 12 हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली आहे. गत 50 वर्षांच्या इतिहासात यंदा प्रथमच कापसाने 12 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच अकोट येथील बाजार समितीत कापसाला प्रतिक्विंटल दर दहा हजार रुपये भाव मिळत आहे.

त्यामुळे वऱ्हाडासह नागपूर जिल्ह्यातील कापूसही अकोटमध्ये विक्रीसाठी येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कापसाला उच्चांकी दर मिळत आहे. यावर्षी अतिवृष्टी आणि अवकाळी मुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. शिवाय उत्पादन खर्चही वाढला. दरम्यान शेतकऱ्यांकडे आर्थिक चणचण असल्याने याचा फायदा स्थानिक व्यापाऱ्यांना झाला.

नाईलाजास्तव मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी गावातच स्थानिक व्यापाऱ्याकडे कमी भावात कापूस विकला. त्यामुळे वाढत्या भावाचा सर्वाधिक फायदा स्थानीक व्यापाऱ्यांना झाल्याचे चित्र आहे. दरवर्षी बोंड अळी, नैसर्गिक संकट यामुळे कापसाच्या उत्पादनात घट पाहायला मिळत आहे. शिवाय कापसाचा उत्पादन खर्चही परवडत नाही. म्हणून अनेक शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले.

मात्र यावर्षी कापूस कमी असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे कधी नव्हे ते क्विंटल मागे बारा हजार रुपये दर मिळलाय. बारा हजार रुपये दर मिळाला असला तरी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मुळे कापूस परवडत नाही. त्यामुळे हेच दर का राहिल्यास कापसाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.