प्रवास महागला ! सीएनजीच्या दरात मोठी वाढ

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिवसेंदिवस महागाई (inflation) वाढत आहे. जीवनाश्यक वस्तूंसह इंधन दरात देखील वाढ होत आहे. आता तर प्रवास पण महागला कारण सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) दरात मोठी वाढ झाली आहे.

सीएनजीच्या किमतीत किलोमागे 6 रुपये तर पीएनजीच्या किंमतीत 4 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल डिझेलनं शंभरी ओलांडल्यानंतर अनेक जण सीएनजी गाड्यांकडे वळले.  तुलनेनं स्वस्त असल्यामुळे लोक सीएनजी गाड्यांना प्राधान्य देत होते. परंतु, पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजीदेखील शंभरी गाठण्याच्या उंबरठ्यावर पोहचत आहे. कारण, आता पुन्हा एकदा मुंबईत (Mumbai) सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या दरात वाढ झाली आहे. सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 6 रुपये आणि पीएनजीच्या किमतीत 4 रुपये प्रति एससीएम वाढ करण्यात आली आहे. या नवीन वाढीमुळे मुंबईत किमती वाढल्यानंतर आता सीएनजी 86 रुपये प्रति किलो आणि पीएनजी गॅस 52 रुपये 50 पैसे प्रति एससीएम दराने उपलब्ध होणार आहे.

ग्राहकांच्या खिशाला कात्री 

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने मे महिन्यात सीएनजीच्या किमतीत दोन रुपयांनी वाढ केली होती. गेलने सिटी गॅस कंपन्यांना पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या किमती वाढवल्या असून त्याचा बोजा सर्वसामान्य मुंबईकरांवर पडणार आहे. ग्रीन गॅस लिमिटेडनं सोमवारी लखनौमध्ये सीएनजीच्या किंमतीत ५.३ रूपये प्रति किलोची वाढ केली. लखनौमध्ये ग्रीन गॅस लिमिटेडद्वारे पुरवठा केला जात असून आता त्या ठिकाणी सीएनजी ९६.१० रूपये प्रति किलो वर पोहोचला. या क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार गेल द्वारे करण्यात आलेल्या या दरवाढीनंततर कंपन्या ही दरवाढ ग्राहकांच्या खिशावर टाकू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

परिणामी गाड्यांच्या विक्रीत घट

दरम्यान, सीएनजी महागल्यामुळे चारचाकी गाड्यांची विक्री घटल्याचे जाणकारांनी सांगितले. गत या कालावधीत पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांची विक्री मात्र १२.८८ लाखांवरून वाढून १३.५६ लाखांवर गेली. मार्चपासून आतापर्यंत सीएनजीचा दर १८ ते २० रुपयांनी महागला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.