शहर बस वाहतूक सेवा प्रवाशांसाठी पर्वणी

0

लोकशाही संपादकीय लेख 

 

शासनाच्या योजनेअंतर्गत जळगाव शहरासाठी बसेसची मंजुरी मिळाली असून जळगाव महानगरपालिकेतर्फे जळगाव शहर बस सेवा राबविण्यात येणार आहे. जळगाव शहरांपासून जास्तीत जास्त २५ किलोमीटर अंतरापर्यंत या बसेस धावणार असल्याने प्रवाशांची फार मोठी सोय होणार आहे. जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागापासून म्हणजे जुने बस स्थानकापासून मुख्यत्वे करून या बसेस सुटून त्यांच्यासाठीचे मार्ग जवळजवळ निश्चित करण्याचे आयोजन करण्यात येत आहे. त्यात जळगाव शहर ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, पाळधी, शिरसोली, उमाळा फाटा, आसोदा, भादली, कानळदा, नशिराबाद, मोहाडी त्यानंतर जळगाव रेल्वे स्टेशन ते महाबळ, संभाजीनगर आदी १८ मार्गांवर या बसेस धावणार असल्याने खाजगी वाहतुकीच्या वाहनांसाठी ताटकळत राहण्याची अथवा अव्वाच्या सव्वा पैसे मोजण्याची आता आवश्यकता राहणार नाही. त्याचबरोबर खाजगी वाहनात प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर असतो. शहर बस सेवेमुळे निर्धारित तिकीट आणि प्रवाशांची सुरक्षित वाहतूक महत्त्वाची ठरणार आहे. पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर आदी मोठ्या शहरांमध्ये शहर बस सेवा म्हणजे प्रवाशांची लाईफ लाईन समजली जाते. त्याच धरतीवर जळगाव शहरात जर बस सेवा सुरू झाली, तर ती प्रवाशांसाठी पर्वणीच ठरणार आहे, यात शंका नाही. या शहर बससेवेमुळे विशेषतः शाळा महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिकणाऱ्यांसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची फार मोठी सोय होणार आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसाठी ही बस सेवा अत्यंत सोयीची ठरणार आहे.

गेल्या दहा वर्षांपासून शहर बस सेवा पूर्णपणे बंद असल्याने विद्यापीठात जाणाऱ्या विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची फार मोठी गैरसोय होत आहे. त्यासाठी शहरात वास्तव्यास असणारे कर्मचारी आपल्या दुचाकी वाहनांद्वारे येजा करीत असल्याने राष्ट्रीय महामार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करतात. सदरचा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे मृत्यूचा महामार्ग ठरलेला आहे. अपघातांची मालिका जणू या महामार्गावर होतच असल्याने दुचाकी वाहतूकदारांच्या सुरक्षेचा प्रश्न सतत चर्चेचा विषय बनलेला असतो. अलीकडे या राष्ट्रीय महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. त्यामूळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात असलेल्या वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आले असले तरी अधून मधून अपघात होत असतात. त्याच महामार्गावर जैन उद्योग समूहाचा मोठा कारखाना असल्यामुळे त्या उद्योगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची जाण्याची संख्या फार मोठी आहे. या उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांनाही या अपघाताचा फटका बसलेला आहे. काही कर्मचाऱ्यांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. त्यासाठी शहर वससेवा सुरू झाली तर प्रवाशांच्या सुरक्षितता प्रश्न उद्भवणार नाही.

जळगाव शहरात विविध कामासाठी अनेक नागरिक शहरात येत असतात. उदाहरणार्थ जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, नोकरीसाठी जळगाव शहरालगतच्या गावातून अपडाऊन करणारे कर्मचारी, शासकीय कामासाठी ये जा करणारे लोक, तसेच जळगाव शहरातील बाजारहाटासाठी येणाऱ्यांची शहर बस सेवेमुळे फार मोठी सोय होणार आहे. शहर बस सेवेचे १८ मार्ग निर्धारित करून त्याचे निहित वेळापत्रक जाहीर केले की, त्या बसेसच्या वेळापत्रकानुसार प्रवाशांना जाण्याची सोय होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खाजगी वाहतूकदारांच्या मनमानीचा होणारा त्रास तसेच वेळेचा अपव्य टाळला जाणार आहे. सर्वसामान्यांसाठी शहर बस वाहतूक सेवा गरजेची आहे. गेल्या महिनाभरापासून जळगाव शहर बस सेवेची चर्चा सुरू झाली असल्याने एकदाची केव्हा ही बस सेवा सुरू होतेय याची वाट प्रवासी पाहत आहेत. जळगावचे नावे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ही बस सेवा सुरू करण्यासाठी विशेष असा पुढाकार घेतला असून महापालिका प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांच्याशी सतत चर्चा करून शहर बस सेवेचा मार्ग सुकर करण्यात येत आहे. ही बस सेवा सुरळीत सुरू झाली तर प्रवासी महापालिका नक्कीच धन्यवाद देतील यात दुमत नाही…!

Leave A Reply

Your email address will not be published.