सुरक्षा रक्षकांनीच मारला मंदिराच्या दानपेटीवर डल्ला

0

जळगाव:- शहरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या बाप लेकाने मंदिरातील दानपेटी तोडून घेवून पसार झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास शहरातील गणपती नगरात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सिंधी कॉलनीतील टीएम नगरात शाम वासुदेव करमचंदाणी हे वास्तव्यास असून ते गणपती नगरातील संत सतरामदास मंदिरात सेवा करतात. त्यांचासोबत रात्रीच्या वेळ काही सहकारी सेवा करण्यासाठी येत असतात. मंदिराच्या परिसरात राकेश गोकुळ राठोड व त्याचे वडील गोकुळ हंसराज राठोड हे वॉचमन म्हणून काम करतात. शुक्रवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास मंदिरात मोठा आवाज झाला. त्यामुळे मंदिरात झोपलेले शाम करमचंदाणी, अविनाश कापडी, प्रकाश पासवाणी, जवाहर तलरेजा यांनी त्याठिकाणी धाव घेतली. यावेळी राकेश व त्याचे वडील गोकुळ राठोड हे मंदिरातील दानपेटी घेऊन जातांना दिसले. त्यांना आवाज दिला मात्र ते दोघे दानपेटी घेवून पसार झाले. त्यांनी मंदिराची पाहणी केली असता, मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसून आला. याप्रकरणी अडीच हजारांचा ऐवज लांबविल्याप्रकरणी सुरक्षा रक्षक राकेश गोकुळ राठोड व त्याचे वडील गोकुळ हंसराज राठोड या दोघांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशील चौधरी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.