कॅंडिटेट्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या 17 वर्षीय डी. गुकेशने पटकावले विजेतेपद

0

टोरंटो : – कॅंडिटेट्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या 17 वर्षीय डी. गुकेशनं विजेतेपद पटकावत इतिहास रचला असून अंतिम फेरीत त्याने अमेरिकन खेळाडू हिकारू नाकामुरा याच्यावर मात केली.

या स्पर्धेत त्याला 14 पैकी 9 गुण मिळवण्यात यश आले, व ही स्पर्धा जिंकणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू बनला असून आता गुकेश विश्वविजेत्याला आव्हान देईल. या वर्षाच्या अखेरीस चीनचा खेळाडू विश्वविजेता डिंग लिरिनविरुद्ध खेळण्याची संधी त्याला मिळेल.

गुकेश हा मूळचा चेन्नईचा आहे. या युवा खेळाडूनं कॅंडिटेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकत रशियाचा महान खेळाडू गॅरी कास्पारोव्हचा 40 वर्षांचा जुना विक्रमही मोडलाय. कास्पारोव्ह 1984 मध्ये जेव्हा ही स्पर्धा जिंकला होता, तेव्हा 22 वर्षांचा होता. तेव्हा तो तत्कालीन चॅम्पियन अनातोली कार्पोव्हला आव्हान देण्यासाठी पात्र ठरला होता. कॅंडिटेट्स स्पर्धेत विजय मिळवल्यानंतर गुकेश म्हणाला, ‘मला आज खूप आनंद होत आहे.

विश्वनाथन आनंद यांच्याकडून अभिनंदन

कॅंडिटेट्स बुद्धिबळ स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम 5 लाख युरो होती. ही स्पर्धा जिंकल्यामुळे गुकेशला 88 हजार 500 युरो म्हणजेच सुमारे 78.5 लाख रुपये रोख पारितोषिकही मिळाले आहे. भारताचा महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्यानंतर ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकणारा गुकेश हा दुसराच भारतीय खेळाडू ठरलाय. आनंद यांनी एक्सवर गुकेशचं अभिनंदन करीत लिहिलं की, ‘सर्वात तरुण चॅलेंजर झाल्याबद्दल डी गुकेशचे अभिनंदन. तू जे मिळवलं आहेस, त्याचा मला खूप अभिमान वाटतो. तू ज्या कारे खेळलास आणि कठीण परिस्थिती ज्या प्रकारे हाताळली, याचा मला अभिमान आहे. या क्षणाचा आनंद घे.’

Leave A Reply

Your email address will not be published.