जळगावच्या सराफा बाजारात CBI ची छापेमारी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव (Jalgaon) येथील सराफा बाजारातील राजमल लखीचंद ज्वेलर्स (Rajmal Lakhichand Jewellers) येथे सीबीआयने छापेमारी (CBI Raid) केल्याची माहिती मिळाली आहे. सीबीआयच्या पथकाकडून मंगळवारी सकाळी ७ वाजल्यापासून छापेमारीला सुरुवात झाली होती. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

अधिकाऱ्यांकडून मोठी गोपनीयता

जळगाव शहरातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन (Former NCP MP Ishwarlal Jain) यांचे सराफा बाजारात राजमल लखीचंद ज्वेलर्स आहे. येथे मंगळवार १३ डिसेंबर रोजी सीबीआयकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र नेमकी कोणत्या प्रकरणात सदर चौकशी सुरु आहे ? यासंदर्भात माहिती देण्यास सीबीआय पथकाने नकार दिला आहे. दरम्यान या छापेमारीवेळी अधिकाऱ्यांकडून मोठी गोपनीयता पाळली जात आहे.

काही कागदपत्रे हस्तगत

मंगळवारी सकाळपासून जळगावात २० ते २५ जणांचे सीबीआयचे पथक दाखल झाले होते. सराफा बाजारातील राजमल लखीचंद ज्वेलर्स येथे सीबीआयच्या पथकाकडून सकाळी ७ वाजल्यापासून चौकशीला सुरुवात झाली. सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही चौकशी सुरू होती. या चौकशीत अधिकाऱ्यांनी काही कागदपत्र सोबत नेली असल्याची देखील माहिती मिळाली आहे.

एकाच वेळी छापा

दिल्ली सीबीआयच्या सुमारे ३० ते ४० जणांच्या पथकाने जळगाव, नाशिक व ठाणे येथील अस्थापना व घरांवर छापे टाकले. यामध्ये सुमारे २० ते २५ जणांच्या पथकाने आरएल समूहाच्या जळगावातील आर.एल. ज्वेलर्स, नाशिक येथील ज्वेलर्सचे शोरुम व मानराज व नेक्सा या वाहनांच्या शोरुमसह जळगावातील राहते घर आणि ठाणे येथील फ्लॅटवर एकाच वेळी छापा टाकला. या ठिकाणाहून पथकाने बँकेसह व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांच्या प्रती ताब्यात घेतल्या.

काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या आरएल समूह नावाने राज्यभरात अस्थापना आहेत. यासाठी त्यांनी स्टेट बँकेकडून सुमारे ५२५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र हे कर्ज थकल्याने बँकेकडे गहाण असलेल्या मालमत्ता बँकेकडून विक्री करण्यात आल्या होत्या. तरी देखील बँकेकडून आरएल समूहाकडे शेकडो कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा दावा करीत असल्याने बँक व आरएल समूहामध्ये वाद सुरू होते.

बँकेतील कर्जाची सेटलमेंट करण्यासाठी समूहाकडून प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु बँकेने कर्जदाराला साक्षीदारांच्या स्वाक्षरी लागणार असल्याची अट घातली होती. मात्र जैन यांचा मुलगा अमरीष जैन हा विभक्त राहत असल्याने तो स्वाक्षरी देण्यास तयार नव्हता. त्यामुळे हे प्रकरण मार्गी न लागत असल्याने स्टेट बँकेने याबाबतची तक्रार दिल्ली सीबीआयकडे केली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.