असंख्य गुणांनी महान औषधी ‘ब्राह्मी’

0

लोकशाही विशेष लेख

 

गोलाकार पानांची ही सरपटणारी वनस्पती, कुंडीत, अंगणात, कोठेही ओलाव्यावर वाढणारी, अशी सर्व भारतात होणारी वनस्पती आहे. ब्राह्मीची (Brahmi) पाने गुरे खात नाहीत. ब्राह्मी पायाने तुडवली तरी मरत नाही. फक्त दोन इंच जाड मातीही पुरते. दक्षिण भारतात होणार ब्राह्मी, मेथीसारख्या लहान मांसल, दंतुर पानांची व जास्त गुणकारी असते. तिकडे ब्राह्मीची पाने चटणी-कोशिंबिरीत घालतात. बहुतेक उष्णतेचा अपाय होऊ नये म्हणून ही रूढी पडली असावी.

गुणधर्म

असंख्य गुणांमुळे महान औषधी आहे.
तुरट व कडू रस, शीत वीर्य, मधुर विपाक किंवा परिणाम, मूत्रल, रक्तस्राव थांबवणारी, सूजनाशक, हृदयाच्या स्नायूंना ताकद देणारी, मेंदूला पोषक, स्वर्य- आवाज सुधारणारी, दीर्घायुष्य देणारी, रसायनाप्रमाणे काम करणारी, ताकद व जीवनशक्ती वाढविणारी, पचायला हलकी, ताणनाशक, रक्तशुद्धीकर, व पित्तनाशक.

वापरण्याची पद्धत

नुसती पाने खावीत.
पानांचा रस त्वचेवर चोळावा.
रसात साखर घालून कल्प बनवतात.
रसात मध घालून चाटण करावे
रसात तेवढेच तिळाचे तेल घालून मंदाग्नीवर पाणी उडून गेल्यावर उरणारे तेल गाळून वापरतात.
वाळलेल्या पानांचे चूर्ण दुधातून घेतात.

ब्राह्मी वनस्पतीचे फायदे

१) आव – आवेची सुरुवात असेल, तर ७-८ पानांचा रस काढून त्यात थोडी जिऱ्याची पूड व खडिसाखर चूर्ण घालून दिवसातून तीन वेळा घ्यावे.
२) आवाज – ब्राह्मी रसाने आवाज सुधारतो, परिणामी वक्तृत्व चांगले करता येते.
३) कफ व खोकला – मुलांमधील कफ खोकल्यासाठी दिलेले मिश्रण (रस+जिरे पूड + खडिसाखर) रोज तीन वेळा द्यावे.
४) कंड, फोड इ.-
या त्वचाविकारांसाठी ब्राह्मीच्या पानांचा रस बाहेरून चोळून लावतात. त्यामूळे सूजही बरी होते.
५) गळू पाने वाटून त्याचा लेप गळवावर लावावा. रस काढून तो पोटातही घ्यावा. त्याने रक्तशुद्धी होते व सूज जाते.
६) चक्कर – पित्तदोष वाढल्याने चक्कर येते, अस्वस्थ होते, वैचारिक गोंधळ होतो. यासाठी एक चमचा रस दोन-तीन वेळा पाण्यातून घ्यावा.
७) झोप न येणे – ब्राह्मीच्या वाळलेल्या पानांचे चूर्ण दुधातून व पाण्यातून घेतल्यास झोप चटकन येते. ट्रान्कीलायझरसारखा परिणाम होतो.
८) डोकेदुखी – पानाचा रस डोक्याला व कपाळावर चोळून लावावा. शिवाय एक चमचा रस पाण्यासह पोटात घ्यावा. उष्णता वाढल्याने होणारी डोकेदुखी बरी होते.
९) त्वचाविकार — ब्राह्मीतील थंड व कडू रसामुळे त्वचाविकार कमी होतात. रक्तशुद्धी होते, त्वचेचा वर्ण सुधारतो. जखमा, सूज, आग बरी होते.
१०) तोतरे बोलणे – अस्पष्ट व अडखळत किंवा तोतरे बोलणाऱ्या मुलांसाठी ब्राह्मीरसाने वाचा शुद्धी होते.
११) नैराश्य – काळजी, नैराश्य, मज्जातंतूंचे विकार अशा गंभीर विकारांवर ब्राह्मीचा रस दिल्याने चांगला उपयोग होतो.
१२) पक्षाघात (पॅरालिसिस) – पुण्याच्या महर्षी आण्णासाहेब पटवर्धन – यांनी १८६० ते १९१० या सुमारे ५० वर्षांत वापरलेला उपचार पुढे दिला आहे. सितोपलादि चूर्ण अर्धा चमचा (४ ग्रॅम) व ब्राह्म ७/८ पाने चावून खाणे व त्यानंतर घोटभर किंवा पाव कप दूध पिणे. हा उपचार रोज दोन वेळा याप्रमाणे काही दिवस करावा लागतो.
१३) मानसिकरोग – बौद्धिक कामे करणाऱ्यांनी व अतिरिक्त मानसिक ताण असणाऱ्यांनी, पुढे गंभीर रोग होऊ नयेत म्हणून रोज ब्राह्मीची दोन-चार पाने चावून खावीत. वर दूध वा पाणी काही तरी प्यावे.
१४) मूत्रसंस्थेचे रोग – ब्राह्मीच्या पानांचा ताजा रस एक-दोन चमचे, ताज्या नारळाच्या पाण्यासह घ्यावे. याने मूत्रपिंड व मूत्राशय यांच्या समस्या दूर होतात.
१५) मेंदूचे पोषण – ब्राह्मीचे मुख्य कार्य मेंदू व मज्जातंतूंवर होते. मेंदूचे कार्य बिघडू नये यासाठी व ताण-तणाव, चक्कर व फिट्स येणे यासाठी ब्राह्मी उपयोगी पडते. मतिमंद मुलांच्या स्वभावात व कार्यक्षमतेत सुधारणा होते. यासाठी ब्राह्मीची पाच पाने रोज खावीत.
१६) स्मरणशक्ती वाढते – मेंदूची तीन कार्ये आहेत ती म्हणजे एखादी – गोष्ट समजणे, धृति म्हणजे ती आत्मसात करणे व स्मृति म्हणजे आठवणे ही तीनही कार्ये नीट चालली तर त्यामुळे मेंदू नवनिर्मिती करू शकतो. मेंदूचे पोषण करण्याच्या ब्राह्मीच्या गुणधर्मामुळ मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ होते. बाहेरून पहाणाऱ्याला स्मरणशक्ती वाढली असे वाटते, पण त्यामागे या तीन कार्यांना ब्राह्मीच्या अंगभूत गुणांनी केलेली मदत असते. यासाठी ब्राह्मीची चार पाने रोज खावीत.
१७) सांधेदुखी – दुखणाऱ्या, सूज आलेल्या सांध्यावर ब्राह्मीचा रस (रोज तीन वेळा) चोळावा तसेच एक दोन चमचे रस पोटातही घ्यावा. खूप लवकर बरे होते.
१८) वयस्थापन – ब्राह्मीमध्ये अँटिऑक्सिडंटस आहेत. त्यामुळे रोगनिर्मितीचे कारण असलेल्या फ्री रॅडिकल्सवर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे त्वचा, बुद्धी व सर्वच शरीराचे म्हातारपण लांबण्यास मदत होते.
१९) मूळव्याध, कावीळ व जठराच्या समस्या • या सर्व विकारांवर – ब्राह्मीच्या पानांचा एक चमचा रस रोज दोन वेळा घेण्याने फायदा होतो.
२०) ब्राह्मीतेल – केशवर्धक तेल : केसांना हे तेल लावल्यामुळे मेंदूला थंडावा येतो. नवीन केस येतात, असलेल्या केसांची लांबी वाढते. केसांना पांढुरकेपणा येत नाही. हे तेल घरी बनवणे सोपे आहे.

ब्राह्मीचे तेल

कृति- जिथे ब्राह्मी भरपूर होत असेल/ मिळत असेल तेथून सुमारे ५० ग्रॅम ब्राह्मीची पाने खोड, फुले, मुळे इ. आणून, धुवून त्यांचा रस काढावा. समजा १०० मि. लि. रस निघाला तर त्यात १०० मि.लि. तिळाचे तेल घालावे. नंतर हे मिश्रण मंदाग्नीवर ठेवून त्यातले पाणी उडून जाऊ द्यावे. म्हणजे ब्राह्मीचे सर्व गुणधर्म उतरलेले तेल मिळू शकते. आपण हे तेल गाळून व दाबून घ्यावे व बाटलीत भरून ठेवावे. दीर्घकाळ टिकते

सर्वांना एक विनंती

अशी ही बहुमूल्य वनस्पती प्रत्येकाने आपल्या घरी कुंडीत वा परसात लावावी व अखेरच्या क्षणापर्यंत ज्ञानेंद्रियांना/ मेंदूला जागरूक ठेवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने ब्राह्मीची चार पाने रोज खावीत केव्हाही. वेळ मिळेल त्या वेळी.
ज्यांना हे शक्य नसेल त्यांनी २ चमचे सारस्वतारिष्ट रोज झोपण्यापूर्वी, पाण्यासह सेवन करावे.

संतोष ढगे, सांगली
८२०८४२६४९४

Leave A Reply

Your email address will not be published.