ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय महिलांची यशोगाथा; मीराबाई चानू

0

लोकशाही विशेष लेख

 

मीराबाई चानू (Mirabai Chanu) यांचा जन्म ८ ऑगस्ट १९९४ रोजी नॉन्गपोक काकचिंग (Nongpok Kakching) या मणिपूरच्या इम्फाळ शहरापासून सुमारे ३० किमी अंतरावर मेईतेई कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव साईखोम मीराबाई चानू असे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव साईखोम कृति मैतेई असे आहे आणि ते सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत आहेत. तसेच त्यांच्या आईचे नाव साईखोम ऊँगबी तोम्बी लीमा आहे आणि त्या चहाची छोटी टपरी चालवतात. मीराबाई आणि त्यांचे भाऊबहीण मिळून ६ जण आहेत आणि त्या सर्वात छोट्या आहेत. मीराबाई जेव्हा १२ वर्षाच्या होत्या तेव्हा त्या आपल्या भावासोबत जंगलात लाकूड आणायला जायच्या. या लाकडाचा उपयोग त्यांचा परिवार इंधन म्हणून करायचा. मीराबाईच्या भावाला जी लाकडाची मोळी उचलणे जड जात होते ती मीराबाई सहज उचलत होत्या. तेव्हा त्यांच्या परिवाराला प्रथम कळले की मीराबाई यांच्यात असाधारण शारीरिक शक्ती आहे.

२००७ मध्ये आपण वेटलिफ्टिंग मध्ये करियर करावं असं मीराबाई चानू यांना वाटलं आणि त्या इम्फाळ येथील खुमन लॅम्प स्पोर्टस् कॉम्लेक्समध्ये (Khuman Lamp Sports Complex) प्रशिक्षण घेऊ लागल्या. अनिता चानू यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रशिक्षणाला सुरवात झाली. सात वेळा विश्वविजेता आणि रजत पदक विजेत्या तसेच राष्ट्रीय प्रशिक्षक कुंजरानी देवी यांनी मीराबाई चानू यांना वेटलिफ्टिंग (Weightlifting) मध्ये करियर करण्यासाठी प्रेरित केले.

२०१७ मध्ये अमेरिकेत ‘वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पयनशिप’ (World Weightlifting Championships) चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मीराबाई यांनी सुवर्ण पदक जिंकले. इतकेच नाही तर मीराबाई चानू यांची निवड रिओ ऑलिम्पिकसाठी (Rio Olympics) झाली. पण या स्पर्धेत त्या भारतासाठी पदक जिंकू शकल्या नाही. २०१८ च्या ‘कॉमनवेल्थ‘ स्पर्धेत त्यांनी भारतासाठी वेटलिफ्टिंग मध्ये पहिले सुवर्ण पदक जिंकले. त्यानंतर लगेचच पुढच्या २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) त्यांनी ४९ किलो वजन गटात रौप्य पदक जिंकून पुन्हा एकदा भारताची शान वाढवली.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदकांसह, मीराबाई यांना २०१८ मध्ये राजीव गांधी खेलरत्न (Rajiv Gandhi Khel Ratna) आणि पद्मश्रीने (Padma Shri) सन्मानित करण्यात आले.

डॉ. निलेश जोशी
संपर्क : ७५८८९३१९१२
जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.