सुप्रसिद्ध रसवैद्य आचार्य वाग्भट

0

लोकशाही, विशेष लेख

आचार्य वाग्भट (Acharya Wagbhat) हे सुप्रसिद्ध रसवैद्य होते. त्यांनी वैद्यकावर अनेक ग्रंथ लिहिले असून, अष्टांगहृदय (Ashtanga Hriday) हा त्यांचा सर्वप्रसिद्ध ग्रंथ होय. वाग्भट्टांना कोणी साक्षात धन्वंतरीच समजतात. आत्रेय संहितेने यांना कलियुगातले महान आचार्य असे म्हटले आहे. अन्य काही विद्वान यांना गौतम बुद्धाचा अवतार समजतात. माधव, वाग्भट, सुश्रुत व चरक असे चार महान आयुर्वेदाचार्य होऊन गेले. ते आयुर्वेदाच्या कोणकोणत्या विषयात प्रसिद्ध होते, त्याविषयीचा एक श्लोक असा –

निदाने माधवः श्रेष्ठः सूत्रस्थाने तु वाग्भटः ।शारीरे सुश्रुतः प्रोक्तः चरकस्तु चिकित्सिते ।।

अर्थ – रोगनिदानात माधव श्रेष्ठ, सूत्रस्थानात वाग्भट शारीरविज्ञानात सुश्रुत श्रेष्ठ व रोगचिकित्सेत चरक श्रेष्ठ होय.

यांच्याही कालाबद्दल काही निश्चित माहिती मिळत नाही. होन्लेच्या मते हे इ. स. च्या ८ व्या किंवा ९ व्या शत होऊन गेले असावेत. हे रसायन, रसकुपी व कायाकल्प गोष्टीसाठी भारतातच नव्हे; तर जावा, कंबोडिया व इजिप्त या देशांतही प्रसिद्ध होते.

यांचा अष्टांगहृदय नावाचा ग्रंथ आयुर्वेदाच्या अभ्यासाचा ग्रंथ मानला गेला आहे. या ग्रंथात सर्व वैद्यकशाखांचे श्लोकबद्ध विवेचन असून, शस्त्रक्रियेचेही विस्तृत विवेचन आहे. हे इजिप्तच्या राजाला औषधोपचार करण्यासाठी तिकडे गेले होते व त्या देशातच ते ब्रम्हलीन झाले अशी मान्यता आहे.

वागभट्टाच्या या यात्रेच्या संदर्भात एक रोमहर्षक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी-
बाळी मिसर (इजिप्त) देशाचा राजा उदर रोगा आजारी पडला. त्याने देशी- विदेशी पुष्कळ वैद्याचे उपचार केले; पण त्याला काडीमात्र गुण आला नाही. एवढयात भारतातल्या वागभट्टाची कीर्ती त्याच्या कानावर गेली. त्याने वागभट्टाना बोलवण्यासाठी माणूस पाठवला. त्यावेळी वाग्भट हे वयोवृद्ध झाले होते. त्यांना इतक्या दूरवरचा प्रवास झेपणार नाही असे त्यांच्या शिष्यांना वाटले व त्यांनी त्यांच्या जाण्याला विरोध दर्शविला त्यावर वाग्भटांनी म्हटले “रोग्याने बोलविल्यावर वैद्य जर गेला नाही तर तो देवाच्या घरी अपराधी ठरतो. मी आता जगलो, मेलो तरी त्यात वाईट वाटण्याचे कारण नाही. माझे या जन्मांतले कर्तव्य संपले आहे. शिवाय असे पाहा की जगातल्या वैद्यांना राजाचा रोग नष्ट करता आला नाही. व ते कार्य जर माझ्या हातून घडले तर त्यात माझाच नव्हे तर संपूर्ण भरतखंडाचा गौरव होईल”.

वागभट्टांनी प्रवासाचा निश्चय केला. आपण बनविलेल्या रस कुप्यांचा आपले मुलगे अगर शिष्य दुरुपयोग करतील म्हणून जाण्यापूर्वी त्या रसकुप्या त्यांनी एका विहिरीत फेकून दिल्या. चार महिने प्रवास करून ते मिसर देशात पोहोचले राजाने त्यांचे उत्तम स्वागत केले. लागलीच त्यांनी राजाच्या रोगावर उपचार सुरू केले तीन महिन्यांत राजाच्या पोटातल्या ग्रंथी पिकून पक्व झाल्या. मग एके दिवशी वाग्भट यांनी राजाला एक जागी नौका विहारासाठी नेले. एका जागी गेल्यावर त्याने राजाला उलटा करून झोके देण्याबद्दल त्याच्या शिपायाना सांगितले. त्यांनी तसे करताच राजाच्या पोटातले दूषित पाणी मुखवटे बाहेर पडले आणि सर्व दूषित भागाचा निचरा झाला. अशा रीतीने राजा रोगमुक्त झाला.

मग राजाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्याने एक भव्य महोत्सव करून वाग्भटांचा सन्मान केला व त्यांना आपले अर्धे राज्य देण्याची घोषणा केली. त्यावर वाग्भट म्हणाले “मला तुझे राज्य नको तू रोगमुक्त झाल्यामुळे भारतीय वैद्यकाचे श्रेष्ठत्व प्रस्थापित झाले, एवढे मला पुरेसे आहे. त्यानंतर काही काळ वाग्भट त्या देशात राहिले. त्यांना तिथल्या काही वनस्पतींचे संशोधन करायचे होते पण त्याच काळात एक मोठी दुर्घटना घडली.

मिसर देशाची राजकन्या एका कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली व तिला गर्भ राहिला. ते समजल्यावर राणीने वाग्भट यांना एकांतात बोलावून घेतले व मुलीची सुटका करण्याबद्दल त्यांना विनंती केली. वाग्भट म्हणाले मी असे पाप कधीही करणार नाही” त्यावर राजकन्या स्वतःहून पुढे आली आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली “वैद्यराज तुम्ही ही गोष्ट केली नाहीत तर एका जिवाच्या हत्ये ऐवजी तीन जीवांच्या हत्येचे पातक तुम्हाला लागेल वाग्भट यांनी विचारले कोणते तीन जीव? राजकन्या म्हणाली “मी व माझा प्रियकर आम्ही दोघेही आत्महत्या करु, व माझ्या बरोबर माझा गर्भ सुद्धा नष्ट होईल.

वाग्भट म्हणाले तरीही मी हे पाप करणार नाही. पण मी तुला दुसरा एक उपाय सांगतो. जन्मणाऱ्या मुलाचा बाप म्हणून तु माझे नाव जाहीर कर म्हणजे सगळ्याच हत्या वाचतील, “राजकन्या पुन्हा म्हणाली पण त्यात तुम्ही मराल अश्या गुन्ह्याला आमच्या राज्यात मृत्यूची शिक्षा आहे.” वाग्भट्ट म्हणाले “काही हरकत नाही परदेशात मृत्यू हे माझ्या जन्मपत्रिकेतले भविष्य आहे. त्यावर राणी बोलली”

“तुम्ही आमचे उपकार कर्ते माझ्या पतीला वरदान देणारे आम्ही तुमच्यावर असा खोटा आरोप कसा ठेवायचा? तसे करणे कृतघ्नपणाचे ठरेल.” वाग्भटाने म्हटले. त्याला इलाज नाही. माझ्याऐवजी राजकन्येला जगु दे” शेवटी निरुपाय होऊन राणीने राजाला वाग्भटां चे नाव सांगितले. राजाला परम दुःख झाले पण एवढया वृद्धावस्थेत वाग्भटाच्या हाताने असले पातक घडू शकेल का, या गोष्टीचा विवेक न करता राजाने वाग्भट यांचा द्वेष करणाऱ्या काही मंत्र्यांच्या दुराग्रही पणामुळे, व राज्याच्या कायद्याच्या मूळे वाग्भट यांना मृत्यू दंडाची शिक्षा फर्मावली आणि ती अंमलातही आणली. मग राणीने चंदनाच्या चितेवर वाग्भट यांच्या देहाला अग्नी संस्कार केला व त्याची रक्षा गंगेत विसर्जित करण्यासाठी सुवर्ण कुंभात भरून भारत देशात पाठवून दिली.

द्वारकाधीश दिगंबर जोशी
संस्कृत अध्यापक
जळगाव
0257-2236815

Leave A Reply

Your email address will not be published.