चालत्या रेल्वेतून उतरने पडले महागात

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

छपरा-सूरत या धावत्या रेल्वेतून आज दुपारी अमळनेर रेल्वे स्थानकाच्या आधी पुलाजवळ पडल्याने रेल्वेच्या चाकाखाली आलेल्या जळगाव येथील तरूणाने अपघातात आपले दोन्ही पाय गमावले आहेत. त्याच्यावर ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारार्थ धुळे जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले आहे.

दिनेश राजेंद्र सोनवणे (वय 30, रा.योगेश्‍वरनगर, नशिराबाद रोड, जळगाव) असे अपघातग्रस्त तरूणाचे नाव आहे. तो जळगाव येथून छपरा-सूरत या ट्रेनने अमळनेर येथे पानखिडकी, कुंभारटेक येथे आपल्या मामांकडे येत होता. अमळनेर रेल्वे स्थानक येण्याआधी गाडी हळू होते. त्याचवेळी खाली उतरताना तो चाकांखाली आल्याचा प्राथमिक कयास आहे. या अपघातात त्याने आपले दोन्ही पाय गमावले आहेत. लोहमार्ग पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.

त्याला तात्काळ उपचारार्थ ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी नातेवाईकांनी त्याला धुळे येथील जिल्हा रूग्णालयात नेले आहे. दरम्यान, अनेक प्रवासी हे स्थानकातील दादरा चढण्या-उतरण्याचा त्रास वाचविण्यासाठी तर काही विना तिकीट प्रवाशी आपला जीव जोखमीत टाकत धावत्या ट्रेनमधून उतरत व चढत असतात. अशाच प्रकारातून या तीशिच्या तरूणाने आपले दोन्ही पाय गमावले असल्याची चर्चा या दुर्दैंवी घटनेनंतर चर्चिली जात आहे. हे प्रकार टाळण्यासाठी प्रवाश्यांनीही स्वतः काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.