गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या १ डंपर, २ ट्रॅक्टरांवर कारवाई

३ महिन्यात १८ वाहनांवर २७ लाख रु दंड भडगाव महसूलची कारवाई

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव तालुक्यासह शहरातील गिरणा नदी पात्रात मध्यरात्री अवैध वाळू उपसा ट्रॅक्टर व डंपर द्वारे सुरु असतो. या बाबत भडगाव महसूल विभागाच्या पथकाने सलग दोन दिवसात अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर व एक डंपर वर कारवाई करत वाहने जप्त करण्यात केली आहे. गेल्या तीन महिन्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या अठरा वाहनांवर कारवाई करत सत्तावीस लाख रुपये दंडाची आकारणी करण्यात आल्याची माहिती तहसिलदार मुकेश हिवाळे यांनी दैनिक लोकशाही शी बोलताना दिली. भडगाव शहरातील कराब शिवारात अवैध वाळूचे दोन ट्रॅक्टर व एक डंपर सलग दोन दिवस कारवाई करून महसूल पथकाने पकडले असून वाहने ताब्यात घेतले आहे.

१ एप्रिल पासून आज पर्यंत अवैध गौण खनिज वाहतुक करणारी १८ वाहने पकडून वाहनांवर २७ लाख १८ हजार रुपये दंड करण्यात आलेला आहे. अवैध वाहतूक करणाऱ्या ८ वाहनांच्या आर.सी. बुक वर बोजा बसवण्यात आला आहे. एका वाहन मालकाच्या सातबारावर बोजा बसवण्यात आला आहे. पथकाचा पाठलाग करणाऱ्या बारा लोकांवर चॅप्टर केसेस दाखल करण्यात आलेल्या आहे. लवकरच अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांचा लिलाव लावून दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार असून. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांच्या स्थावर, जंगम मालमत्ताचा शोध घेऊन त्यांचा लिलाव लावण्यात येणार आहे. अशी माहिती तहसीलदार मुकेश हिवाळे यांनी दैनिक लोकशाहीशी बोलताना दिली. सदर भडगाव महसूल विभागाच्या पथकामध्ये नायब तहसीलदार राजेंद्र अहिरे, तलाठी पाशा हलकारे, रामसिंग जारवाल, तलाठी राहूल पवार, व्ही.सी.पाटील, व्ही.पी.शिंदे, तलाठी अविनाश जंजाळे, वाहन चालक लोकेश वाघ आदींचा सहभाग होता. सदर वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.